तुमसर : गरिबांना हक्काचे घरकुल मिळावे, याकरिता बीपीएलधारक लाभार्थी ठरत आहेत. त्यात सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय घरकूल लाभार्थांचीही संख्येचा आकडा फुगला असताना जिल्ह्याला व तालुक्याला दिलेल्या तुटपुंज्या घरकूलाच्या उद्दिष्टामुळे ओबीसी लाभार्थ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.शासनस्तरावरून होणाऱ्या घरकूलाचे वाटप हे सन २००२ च्या बीपीएल सर्व्हेक्षण यादीनुसार सुरू आहे. त्या २००२ च्या यादीनुसार जिल्ह्यात जवळपास ९ हजारांच्या घरात सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय लाभार्थी घरकूलाच्या प्रतिक्षा यादीत असताना शासनाने भंडारा जिल्ह्याला ओबीसी करिता तुटपुंजे उद्दिष्ट दिले. त्यामुळे तुमसर तालुक्याला केवळ ५५ घरकूल मंजूर झाले आहेत. तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायती आहेत. त्यात १०७ गावाचा समावेश होतो. या गावातील ओबीसी बीपीएल धारकांची यादीही लांबच लांब असताना मंजूर ७५ घरकूलाचे वाटप करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. प्रत्येक गावातून ३ घरकुले याप्रमाणे २५ गावातील सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे उर्वरित ७२ गावांतील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या पदरी निराशा मिळणार आहे. दिवसेंदिवस सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातील बीपीएलधारकांची संख्या जास्त आहे. सन २०११ च्या बीपीएल सर्वेक्षणानुसार घरकुलाचे लाभार्थी होणार आहेत. मात्र २००२ च्या सर्वेक्षणातील लाभार्थीनाच भोपळा मिळत असेल तर २०११ च्या समाविष्ट सर्वेक्षण यादीतील घरकुल लाभाथ्यांचे काय होणार, शासनातर्फे मिळालेले घरकूलांचे तुटपुंज्या उद्दिष्टामुळे जिल्हा घरकुल मुक्त कसा होणार, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी पक्षातर्फे राष्ट्रवादीचे देवचंद ठाकरे यांनी केला आहे. जनसामान्यांना न्याय देण्याकरिता घरकूलांचे उद्दिष्टे बाळगून त्यांनी अन्य पक्षातर्फे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ठाकरे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
घरकूल लाभार्थ्यांच्या पदरी निराशा
By admin | Published: September 25, 2015 12:29 AM