मोहाडीत मंजूर झालेल्या घरकूलधारकांना नगरपंचायतीच्यावतीने आतापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. १ लाख ५० हजार रुपयांचा हप्ता अद्यापही मिळाला नाही. उर्वरित पैसे मिळतील या आशेने अनेकांनी उधारीवर बांधकाम साहित्य घेऊन घराचे बांधकाम केले, मात्र एक वर्षापासून उर्वरित रक्कम मिळाली नाही. दुसरीकडे दुकानदारांनी पैशाचा तगादा लावला. अनेकांनी जुने घर पाडून घरकुलाचे बांधकाम केले. घरकूल पूर्ण झाले नसल्याने अनेकांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. काहींनी बाजूलाच तंबू ठोकून आपला संसार उभारला आहे. घराचे बांधकाम पैशाअभावी थांबल्याने लाभार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. बुधवारी त्यांनी नगरपंचायतीवर हल्लाबोल केला. यावेळी नगरपंचायतीच्यावतीने आठ दिवसात तिसरा हप्ता देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. आठ दिवसानंतर पैसे मिळाले नाही तर नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी विठोबा कोहाड, जगदीश डेकाटे, पांडुरंग हेडाऊ, तुकाराम निकोडे, दामोदर हेडाऊ, यशवंत निपाने, बाबुराव मारबते, अक्रम निमजे, इंदुताई कारेमोरे, संगीता बुरबादे, लीलाबाई पाठक, कमलाबाई बुरबादे, काशीबाई निमजे, कौशल्या कोल्हे, छाया पात्रे, वीणाबाई भिवापूरकर याच्यासह अनेक लाभार्थी उपस्थित होते.