४४३ कोटींचा निधी : अर्थसंकल्पीय निधी वितरित होणारदेवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नसल्यामुळे राज्यातील दोन लाख ८० अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन अनेक महिन्यांपासून रखडलेले होते. त्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला होता. अखेर राज्य शासनाने मानधन अदा करण्यासाठी ४४३ कोटी २४ लाख ८० हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील ९५ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधना तिढा लवकरच सुटणार आहे.केंद्रपुरस्कृत योजना महिला व बालविकास विभागामार्फत मुंबई येथील एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तांच्या कार्यालयाकडून राबविण्यात येते. केंद्र व राज्याच्या हिश्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे. केंद्र शासनाच्या निधीअभावी अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन अनेक महिन्यांपासून रखडले आहे.त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेवून राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पीत रक्कम केंद्र सरकारकडून प्राप्त झाली नसली तरी खर्च करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विषयावर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. अखेर राज्यशासनाने अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच तो निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सध्या ९५ हजारांहून अधिक अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनिसांना दिलासा मिळणार आहे.अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना देण्यात येणाऱ्या मानधनासाठी २०१८-१९ मध्ये १३५९ कोटी ८९ लाखांचा अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आला. राज्य शासनाने ३० आॅगस्ट रोजी ४४३ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी मानधनासाठी ६७८ कोटी ७५ लाख रुपये वितरीत करण्यात आलेले आहेत.अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्यांना वेतन श्रेणीचा लाभ देणे गरजेचे आहे. वेतन श्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय होईपर्यंत संघटनेचा लढा सुरुच राहील.-हिवराज उके, कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी युनियन, भंडारा.
अंगणवाडीतार्इंच्या मानधनाचा तिढा सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 9:46 PM