साकोली : मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी साकोली परिसरातील सेवकांनी केली आहे. बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना करून अनेकांना व्यसनांपासून परावृत्त केले आहे.
शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना वाईट व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करते. एवढेच नाही तर दारू सोडविण्यासाठीही विविध उपक्रम राबविले जातात. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. परंतु बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्माच्या शिकवणीमुळे शेकडो नागरिक दारूसारख्या वाईट व्यसनापासून दूर झाले. नागपूर येथील जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना केली. सामान्य माणसाला परमेश्वराबद्दल जागवून त्यांना दारू, जुगार, गांजा, सट्टा, लाॅटरी, चोरी यासारखे वाईट व्यसन बंद करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी आचरणात आणले. आज अनेक परिवार सुखी झाले आहेत.
सत्य, मर्यादा व प्रेमाची शिकवण दिली आहे. एवढेच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन, मर्यादित कुटुंब, हुंडा पद्धतीला आळा, स्त्री भ्रूणहत्या यासारखे कार्य हाती घेऊन ते पूर्ण केले. त्यांच्या मृत्यू पश्चात आजही हे कार्य अविरत सुरू आहे. अशा या मानव धर्माची शिकवण देणाऱ्या आणि अनेक कुटुंबांना सुखी करणाऱ्या बाबा जुमदेवजी यांना केंद्र सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी साकोली परिसरातील सेवकांनी केली आहे. नागपूर येथे या धर्माची सुरुवात झाली असली तरी आता हा धर्म सर्वत्र विस्तारला असून लाखो अनुयायी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आहेत.