रवी धकाते यांचे प्रतिपादन : सामाजिक न्याय भवनात ज्येष्ठ नागरिक दिनभंडारा : ज्येष्ठ नागरिक तसेच आईवडीलांनी आपल्या आयुष्यात अनेक कष्ट घेतलेले असतात. त्यांच्या कष्टामुळे व अनुभवामुळे समाज समृद्ध होत असते. आज विभक्त कुटुंब पद्धतीत घरातील तसेच वृद्ध व्यक्तींकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती बळावत बालली आहे. असे न करता समाजातील प्रत्येकांनी ज्येष्ठ नागरिक व वृद्ध व्यक्तींना सन्मानाची वागणूक द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते यांनी केले.सामाजिक न्याय व विषेष सहाय्य विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर व जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सहाय्य आयुक्त समाज कल्याण देवसूदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, माजी जिल्हा माहिती अधिकारी स.बा. मोहतुरे, ज्येष्ठ नागरिक लांजेवार, माजी सहाय्यक आयुक्त मोहबंदी यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमात मरणोत्तर देहदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना धकाते पुढे म्हणाले की, शासनाने अवयवदान चळवळ मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. अवयवामुळे अनेक वेळा लोकांचे प्राण जातात. देशात अवयव न मिळाल्याने रुग्णांना प्राणास गमवावे लागते. अशा वेळी मोठ्या प्रमाणात अवयवदान करणे गरजेचे झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने अवयवदानाचे अर्ज भरून गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देवसूदन धारगावे यांनी या कार्यक्रमात दिली. ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान उंचावणे, घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराची जपणूक करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी करमणूक व विरंगुळा केंद्र तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासंबंधात धोरण, ज्येष्ठ नागरिकांच्या निवाऱ्याची सोय करणे, वसाहत तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षितता, कायदेशिर मदत, वृद्धाश्रम योजना व शासनाच्या विविध योजनांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मदत व सहाय्य केल्या जात असल्याचे ते म्हणाले. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, माजी जिल्हा माहिती अधिकारी स.बा. मोहतुरे, ज्येष्ठ नागरिक लांजेवार, माजी सहाय्यक आयुक्त मोहबंशी यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमात सोनाली लांबट यांनी अवयवदानाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संतोष भुरे यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक द्या
By admin | Published: October 02, 2016 12:33 AM