‘अ’ श्रेणीच्या ६३ शाळांचा समावेश : मोहाडी तालुक्यात सहा शाळामोहाडी : शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे यासाठी विविध शैक्षणिक कृती प्रकल्पांचा अभ्यास केला जात आहे. या शैक्षणिक समद्ध शाळा या नावाने कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रेडिंगसाठी दिलेल्या सात सूत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शाळांना ‘अ’ श्रेणी मिळाली त्यांना ‘समृद्ध शाळा’या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे.समृध्द शाळा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भावनिक व बौध्दिक गरजा लक्षात घेता स्वयंकृती आराखडा तयार करण्यात आला. उपक्रमाची फलश्रृती बघता संबंधित शाळेला माझी समृध्द शाळा या प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मानपत्र शाळा ‘अ’ श्रेणीच्या असायला हव्यात. बाह्य मुल्यमापनानंतर विद्या प्राधिकरणामार्फत ‘अ’ श्रेणी मिळणार आहे. त्यानंतर त्या शाळा समृध्द शाळा घोषित केल्या जातील. भंडारा जिल्ह्यात ६३ शाळांना अंतर्गत मूल्यमापनानंतर ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यात मोहाडी तालुक्याच्या जि.प. प्राथमिक शाळा खुटसावरी, आनंद प्राथमिक शाळा जांब, जि.प. शाळा एकलारी, जि.प. प्राथमिक शाळा धुसाळा, जि.प. प्राथमिक शाळा एकलारी, जि.प. प्राथमिक शाळा धुसाळा, जि.प. प्राथमिक शाळा करडी व गुरुदेव चिंतामन बिसने विद्यालय मोहाडी या सहा शाळांचा समावेश आहे. भंडारा तालुक्याच्या १८ शाळा, लाखांदूर ३, लाखनी ९, पवनी ५, साकोली १२ व तुमसर तालुक्यातील १० शाळांचा समावेश आहे. एकूण १२०१ शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केले. त्यात अ श्रेणीत ६३ शाळा, ब श्रेणीत ३९५, सी श्रेणीत ४३७ व डी श्रेणी ३०६ शाळांचा समावेश आहे. अजूनही अंतर्गत मूल्यमापन अथवा मूल्यमापन अपलोड करण्यास सुरुवात केली नाही अशा शाळांची ११६ अशी संख्या आहे. शालेय मूल्यांकानात शाळेचे सामर्थ्य स्त्रोत, अध्यापन-अध्ययन आणि मूल्यांकन, विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास, शिक्षकांची कामगिरी आणि व्यवसाय विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, समावेशन, आरोग्य आणि संरक्षण, उत्पादक समाजाचा सहभाग असे ७ क्षेत्रात ४६ मानके आहेत.‘अ’ ग्रेडेशनसाठी ९० टक्केचा वर गुणांक असणाऱ्या शाळा समृध्द शाळा विद्या प्राधिकरणामार्फत बाह्य मूल्यमापनासाठी पात्र ठरल्या आहेत. ज्या शाळांना ‘अ’ च्या पुढे श्रेणी मिळाली त्या शाळांना प्रमाणपत्र दिले जाणार नाही.शाळांनी समृध्द शाळांमध्ये येण्यासाठी पुढील नियोजन करावे असे सुचविण्यात आले आहे. ‘माझी समृध्द शाळा’ यासाठी शिक्षणामध्ये पोष्टीक वातावरण निर्माण झाले पाहिजे.शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवादाची देवाण-घेवाण अधिक मजबूत व्हावी यासाठी वाचन, लेखन, संख्याज्ञान या संकल्पनावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार मूल्यमापन चाचण्या, शिक्षक स्रेही प्रशासकीय वातावरण, बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)१५ दिवस मूल्यांकन‘अ’ श्रेणी प्राप्त शाळांचे बाह्य मुल्यमापन १० एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत केले जाणार आहे. एका शाळेला बाह्य मूल्यमापनासाठी दोन दिवस दिले जातील. दुसऱ्या जिल्ह्यातील निर्धारक बाह्य मूल्यमापनासाठी येणार आहेत.
समृद्ध शाळांना दिले जाणार सन्मानपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 12:30 AM