साकोली : राज्यातील सुप्रसिद्ध नागझिरा अभयारण्यातील हत्ती कॅम्प बंद झाला आणि येथील हत्तींची गडचिरोलीच्या कमलापूर कॅम्पमध्ये रवानगी केली. तेव्हापासून येथील वैभवात उणीव जाणवत आहे. त्यातच कमलापूरच्या कॅम्पमध्ये काही हत्तींचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा स्थितीत नागझिरा अभयारण्यातून स्थलांतरित करण्यात आलेल्या रूपाला परत आणण्याची मागणी वन्यजीवप्रेमी करीत आहेत.
नागझिरा हे महाराष्ट्रातील नावारूपास आलेले अभयारण्य आहे. १९७० मध्ये घोषित या अभयारण्याचे क्षेत्रफळ १५२.८१० चौरस कि.मी. असून जैवविविधतेत अव्वल आहे. प्रसिद्ध वनाधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांची ही कर्मभूमी होय. त्यांच्या साहित्यातून या जंगलाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली. प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनीही या भागावर लेखन केले. साकोलीतील लेखक विनोद भोवते यांनीही आपल्या लेखनातून नवेगाव - नागझिरा साकारला आहे. अशा या अभयारण्यात काही वर्षांपूर्वी हत्ती कॅम्प होता.
१९६७ मध्ये आसाम राज्यातून हरेलगज, मावी, मुक्तमाला आणि रूपा या चार हत्तींना वनातील कामे करण्यासाठी नवेगावच्या जंगलात आणण्यात आले. त्यावेळी हत्तींसाठी मोठमोठी शेड तयार करण्यात आली. येथील वनाची कामे आटोपल्यावर हरेलगजला अमरावती व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आले, तर मावी आणि मुक्तमाला यांचा मृत्यू झाला. रूपा हत्तीण जिवंत आहे.
आसाममधून आल्यानंतर रूपाला नवेगावव्यतिरिक्त गडचिरोली, भंडारा, पेंच, नागझिरा आदी ठिकाणी कामासाठी जावे लागले. तिच्या सोबतीला केरळमधील माहूत व्ही. अप्पू पन्नीकर आणि धर्मा सोनूजी धुर्वे असायचे. आता रूपा दिसत नसल्याने पर्यटक निराश होतात. रूपा हत्तीणीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर तिला २६ मार्च २०१८ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागातील कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये नेण्यात आले आहे. गतवर्षी आदित्य हत्तीचा झालेला मृत्यू आणि गत महिन्यात सई आणि अर्जुन या हत्तींच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूने कमलापूरला भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे रूपा हत्तीणीला नागझिरा अभयारण्यात परत पाठविण्यात यावे, अशी मागणी निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची आहे.
बॉक्स
पर्यटकांचे आकर्षण रूपा
नागझिरा अभयारण्यात असताना रूपाच्या मदतीने पर्यटकांना अनेकदा व्याघ्रदर्शन झाले. नागझिरात भ्रमण करताना वन्यजीवांचे दर्शन झाले नाही, तर पर्यटक रूपा हत्तीणीला बघायचे. माहुताच्या उपस्थितीत तिच्यासोबत फोटो काढत होते. नागझिरातील पाचकमरा भागात राहायची. तिला दररोज दहा किलो गव्हाच्या पिठाचे पाणगे, एक किलो गूळ, १०० ग्रॅम तेल आणि २५० ग्रॅम मीठ आहारात दिले जायचे.