एलसीबीची कारवाई : २.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरातील तकिया वॉर्डात झालेल्या घरफोडी संदर्भात एका अट्टल घरफोड्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ लाख ८१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग तोमर (२६) रा. काजीनगर भंडारा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तकिया वॉर्डातील ओमप्रकाश मोहबंशी हे परिवारासह विवाहासाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान आरोपीने घरात प्रवेश करून कपाटातील दागिने, रोख ७०० रूपये असा एकूण दोन लाख ८१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला सोपविण्यात आला. जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढली. संशयावरून जितेंद्र तोमर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान घरफोडीची कबूली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, वामन ठाकरे, राजेश गजभिये, सुधीर मडामे, बंडू नंदनवार, सावन जाधव, रोशन गजभिये, बबन अतकारी, जिनेंद्र आंबेडारे, स्रेहल गजभिये, अनुप वालदे, योगिता जांगळे, रामटेके, ठवकर आदींनी केली. तडीपारचा आदेश जारीजितेंद्र तोमर याच्याविरूद्ध भंडारा जिल्ह्यात घरफोडीच्या मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद आहे. त्यामुळे तो सराई गुन्हेगार असल्याने त्याला भंडारा व लगतच्या जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तो प्रस्ताव त्यांच्याकडून मंजूर करण्यात आला असून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.
घरफोड्याला अटक
By admin | Published: June 05, 2017 12:13 AM