गोपालकृष्ण मांडवकरभंडारा : सकाळपासून सुरू असलेला कमी अधिक दाबाच्या विजेमुळे शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली. यात घरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना शनिवारी, २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली. कैलास भजन वासनिक (४८) असे पीडित घरमालकाचे नाव आहे.
गावामध्ये सकाळपासूनच कमी अधिक दाबाचा वीजपुरवठा सुरू होता. विजेचा लपंडावही सुरू होता. कैलास वासनिक यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी व एक मुलगा असतो. घटनेच्या वेळी कैलास यांची पत्नी व मुलगा शेत शिवारात गेले होते. घरानजीक कार्यक्रम असल्याने कैलास या कार्यक्रमात जेवणासाठी गेले होते. याचदरम्यान, घरात अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. घरातील साहित्य जळू लागले. घराजवळ खेळत असलेल्या मुलांना घरातून धूर निघताना दिसल्याने त्यांनी आरडाओरड करून घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.
नागरिकांनी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, यामध्ये वासनिक यांच्या घरातील विद्युत उपकरणांसह काही साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत त्यांचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
कैलास वासनिक अल्पभूधारक शेतकरी असून आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शेतीसोबतच हाताला मिळेल ते काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अलीकडेच त्यांनी राहत्या घरात काही विद्युत उपकरणे देखील खरेदी केली होती. ती सुद्धा आगीत जळाली.