लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परिसरात सोमवारी सायंकाळी धोधो बरसलेल्या पावसाने अनेकांची दाणादाण झाली. त्यातच गांधी चौकातील एक घर कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाने धानपिकांना मात्र जीवदान मिळाले आहे.पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास काळाकुट्ट ढगाने आकाश भरून आले. ४ वाजताच्या सुमारास धोधो पावसाला सुरूवात झाली. दोन तास सारखा पाऊस बरसत होता. या पावसात गांधी चौकातील सहादेव उरकुडे यांच्या मालकीचे पडके घर पावसाने कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागला. या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली. नुकसान भरपाईची मागणी यावेळी करण्यात आली.परिसरात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले आहे. पावसाची आवश्यकता असताना नेमक्या त्याचवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. रात्री उशिरापर्यंत पालांदूर परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती.
धुवाधार पावसात घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:50 AM