भंडारा : साकोली शहरात मागील काही दिवसापासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून लागोपाठ होत असलेल्या चोऱ्यांमुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
शहरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चोरीमध्ये चोरट्यांनी १ लाख १४ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. प्राप्त माहितीनुसार पंचशील वार्ड निवासी ग्रामसेवक राजू राऊत यांच्या घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ६८ हजार रुपये व सोन्याच्या दागिन्यांसह एकूण एक लाख चार हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच, याच घरामध्ये असलेल्या तीन वेगवेगळ्या किरायदारांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिन्ही ठिकाणी चोरांना काहीही सापडले नाही.
दुसऱ्या चोरीमध्ये संत लहरी बाबा मठ येथील दानपेटी फोडून चोरांनी १० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. मागील दिवसात श्रीनगर कॉलनी येथे ग्रामसेवकाच्या घरातून १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. तर, पोस्टमास्टर यांच्या घरी झालेल्या चोरीमध्ये चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
शहरात लागोपाठ होत असलेल्या चोरी वाढीमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन कामी लागले असून श्वानपथक पाचारण करण्यात आले. यासोबतच दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये कुटुंबीय बाहेरगावी जात असल्यास त्याची पूर्वसूचना पोलीस ठाणे साकोली यांना द्यावी. तसेच रोख रक्कम व दाग-दागिने ही सुरक्षित ठिकाणी ठेवावी असे आवाहनही पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी शहरवासीयांना केले आहे.