भंडारा/गोंदिया:लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानात दोन्ही जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान ठप्प झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. याबाबत त्या अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करून याची चौकशी करण्याचे आश्वासन खा. पटेल यांना दिले आहे.या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण १७ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २१४९ मतदान केंद्रांमध्ये मतदान सुरू झाले आहे. उन्हाळ््याचे दिवस असल्याने नागरिक सकाळच्या वेळेस अधिक येतील असा अंदाज होता. त्यानुसार मतदारांचे येणेही सुरू झाले होते. मात्र मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळानंतरच बऱ्याच केंद्रांमधील ईव्हीएम मशीन्स बंद पडत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या मशीन्सची दुरुस्ती होऊन किंवा त्याजागी नवीन मशीन्स लावून मतदानाला केव्हा प्रारंभ होईल हे अद्यापही अनिश्चित आहे.