महामार्ग नव्हे मृत्युमार्ग : रहदारी वाढली तरीही उपाययोजना शून्यभंडारा : राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. उजव्या भागाला वसलेल्या भंडारावासियांसाठी हा महामार्ग जीवघेणा मार्ग ठरत आहे. या महामार्गावर दररोज लहानमोठे अपघात होत आहेत. यात अनेकांचा जीवही गेला आहे. दोन दिवसांपूर्वी शेषराव तितीरमारे नामक पोलीस कर्मचाऱ्याचा ट्रक अपघातात हकनाक बळी गेला. दररोज बळी जात असतानाही पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही.मुंबई - हावडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भंडारा शहर असून या मार्गाचे चौपदरीकरण झालेले आहे. केवळ मुजबी ते सिंगोरी हे नऊ कि.मी. चे अंतर चौपदरीकरणापासून वंचित आहे. यावर्षीपर्यंत या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी कुणी पुढाकार घेताना दिसले नाही. जानेवारी महिन्यात या मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याची घोषणा झाली. परंतु काम केव्हा सुरू होणार याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.मागील वर्षभरात महामार्गावरील रस्ते अपघातात १७८ जणांचा हकनाक बळी गेला. या अपघातात चारशेहून अधिक जण जखमी झाले. त्यातील अनेकांना अपंगत्व आले. याच मार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याची आकडेवारी पोलिसांकडे नोंद आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आणखी किती बळी घेणार महामार्ग!
By admin | Published: March 30, 2016 12:50 AM