सुनील मेंढे : पुण्यानुमोदनानिमित्त विविध कार्यक्रम
भंडारा : माणूस किती जगतो, त्यापेक्षा तो कसा जगतो हे महत्त्वाचे आहे. यशाच्या शिखरावर जाताना कितीही उंच चढला तरी मनुष्याने पाया कधीही विसरू नये, असाच बोध स्मृतिशेष शालिनीताई कोचे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तर दिसून येतो. प्रपंच सांभाळून अनेक विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शालिनीताई कोचे यांच्या कार्यापासून समाजाने बोध घ्यावा, असे विचार खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका स्मृतिशेष शालिनीताई कोचे यांच्या प्रथम पुण्यानुमोदनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ते अमृत बंसोड, मिलिंद शहारे, समता सैनिक दलाचे प्रवक्ते भदंत नागदीपांकर, लायन्स क्लब रास सिटीचे राधाकृष्ण झंवर, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे उपस्थित होते. स्मृतिशेष शालिनीताई कोचे यांच्या जीवनकार्यावर आधारित शालवृक्ष या स्मरणिकेचे विमोचन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
राधाकृष्ण झंवर म्हणाले, प्रत्येकाने स्वतःचा प्रपंच सांभाळून समाजसेवेचा वसा जोपासला पाहिजे. त्या समाजसेवेमधून मिळणाऱ्या समाधानाची किंमत फार मोठी असते, असेही ते म्हणाले. अमृत बंसोड म्हणाले, ज्याप्रमाणे मेणबत्ती स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देते असेच जीवन सर्वांनी जगले पाहिजे. घर, कुटुंब, नातेवाईक, गरजू व समाजातील व्यक्तींना मदत करून शालिनीताई कोचे यांनी घडविलेला इतिहास कायमस्वरूपी आठवणीत ठेवण्यासारखा आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी दादासाहेब काेचे यांनी स्मृतिशेष शालिनीताई कोचे यांनी केलेल्या कार्याचा पुढे मोठा वटवृक्ष व्हावा म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी अँड रिसर्च सेंटर भंडारा यांना एक एकर व ५३ डेसिमल जमीन तर समता सैनिक दलाला एक एकर जमीन दान देण्याची घोषणा केली. भदंत नागदीपांकर यांनी विविध विधी पार पाडले. यावेळी समता सैनिक दलामार्फत शालिनीताई कोचे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली. जिल्हाभरातून आलेल्या समता सैनिक दलाच्या महिला व पुरुष यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. दीपाली शहारे यांनी आपल्या आईविषयीच्या मधुर स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी भदंत नागदीपांकर यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, वानखेडे, आहुजा डोंगरे, मन्साराम दहिवले, मनीष वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिथींच्या हस्ते लायन्स क्लब ब्रांच यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून पार पडला. कार्यक्रमाचे सुरेख संचालन स्वप्नील रामटेके यांनी तर आभार संयोजक दादासाहेब कोचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनीष खारा, भाग्योदय कोचे, पराग कोचे, गोपीचंद कोचे, वैशाली मिलिंद शहारे, दीपाली मनोज शहारे आदींनी सहकार्य केले.