भंडारा : जिल्ह्यात आठवडी बाजार, दवाखाने, घराचे अंगण, कार्यालय, बसस्थानक किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकी चोरट्यांनी पळवल्या आहेत. मागील पाच महिन्यांत ५३ दुचाकी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना फारसे यश आलेले नाही. चोरीचे सत्र आजही कायम असून वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हँडल लॉक केल्यानंतरही दुचाकी चोरीला जातेच कशी?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही चोरटे हँडल लॉक तोडण्यात मास्टर असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
५३ दुचाकींची चोरी पाच महिन्यातजानेवारी ते में या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातून ५३ दुचाकींची चोरी झाली आहे. यासोबतच अन्य वाहनांच्याही घटना घडल्या आहेत. चोरीच्या घटना केवळ शहरातच घडतात, असे नाही. ग्रामीण भागातही आता दुचाकी चोरीचे लोण पसरल्याचे दिसून येत आहे.
सापडल्या केवळ १७दुचाकी चोरीची संख्या झपाट्याने वाढत असताना चोरांना वेळीच पकडण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. पाच महिन्यांत ५३ पैकी केवळ १७ दुचाकींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या घटनांत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ३६ गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत.
दवाखाना, बसस्थानकातून जास्त चोरीकाही लोक हे बसस्थानकात दुचाकी लावून प्रवासाला जातात. तर काही जण रुग्णांना भेटण्यासाठी खासगी किंवा सरकारी दवाखान्यात येत असतात. अनेकजण आठवडी बाजारात दुचाकीने येतात; मात्र परिसरात कोणी नसल्याची संधी साधूनच चोरटे दुचाकी पळवत असल्याचे तक्रारीत नमूद असते.
सार्वजनिक ठिकाणाहूनच दुचाकी चोरी जास्त प्रमाणात होतात. दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. पाच महिन्यांतील ५३ घटनांपैकी १७ घटनांची उकल पोलिसांनी केली आहे. या प्रकरणांत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य घटनांतील चोरांचा कसून शोध घेतला जात आहे.- नितीन चिंचोळकर, पोलिस निरीक्षक, भंडारा.