शेतकऱ्यांच्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. खरीप व रबी हंगामातील शेतपिक अस्मानी व सुल्तानी संकटाने धोक्यात आले. तर उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारून फस्त करीत आहे. अशा संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत. तब्बल शेकडो एकरातील पीक नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेले पीक वन्यप्राण्यांकडून फस्त केल्या जात आहे. ते जनावरांसाठी लावलेला चारा, गहू, हरभरा, वाटाणा, भाजीपाला व रबीमध्ये उन्हाळी धानाची टाकलेले पऱ्हे वन्यप्राणी डुक्कर, सांबर, हरीण, नीलगाय या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहेत. तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे पुढे येत आहेत.
शेतकरी आपल्या शेतामध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून उत्पन्न काढून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस झटत असतो. परंतु रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हे भयावह आहे. अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांनी अक्षरश: शेतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. वन कायद्यामुळे शिकार करणाऱ्यांना मोठी शिक्षा असल्यामुळे आज शेतकरी शिकार करीत नाही. त्यामुळे वन्य प्राणी सरळ जंगलातून शेतामध्ये येतात आणि रात्रभर चरून जंगलात परत जातात. रात्रीच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.
यासाठी कायद्यामध्ये तरतूद करून या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी व नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. जर याकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही, तर पुढे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी -अधिकाऱ्यांशी संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्ह याठिकाणी दिसत आहेत.