तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार
लाखांदूर : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता तालुका आरोग्य विभागाच्या पुढाकारात तालुक्यातील सरांडी (बू) येथील नागरिकांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. तालुका आरोग्य विभाग व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकारात तालुक्यातील सरांडी (बू) येथील जि. प. हायस्कूल शाळेत कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
या लसीकरणात गावातील शेकडो महिला पुरुष नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेतले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम यांनी सदर लसीकरण केंद्राला भेट देत गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तथापि लसीकरण संबंधाने नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता ४५ वर्ष वयोगटांतील व त्यापेक्षा अधिक वयोगटांतील सर्वच नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
तालुका आरोग्य विभाग व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकारात आयोजित या लसीकरण कार्यक्रमात गावातील व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेत प्रचंड प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, गत काही दिवसांपासून तालुक्यात कोविड चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात काही नागरिकांनी अफवांना बळी पडून लसीकरण न करून घेतल्याने सदर रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे. सदर परिस्थितीत कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेणे अनिवार्य असल्याचे आरोग्य विभागांतर्गत आवाहन केले जात आहे.
दरम्यान, तालुक्यातील ज्या नागरिकांनी अद्याप लसीकरण करून घेतले नाही अशा ४५ वर्ष वयोगटांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
बॉक्स :
भागडी गावातील नागरिकांचा अल्प प्रतिसाद
लसीकरणाअभावी तालुक्यात नियमित कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत असताना आरोग्य विभागाअंतर्गत आयोजित लसीकरण कार्यक्रमात तालुक्यातील भागडी येथील नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. सदर प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नलिनीकांत मेश्राम यांच्या नेतृत्वात भागडी गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेण्यासाठी आवश्यक जनजागृती करण्यात आली आहे. तालुक्यातील अन्य गावांतील नागरिकांनीदेखील कोरोना प्रतिबंधासाठी अधिकाधिक संख्येने लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य विभागांअंतर्गत करण्यात आले आहे