लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून पुन्हा सुरु झाल्याने आता विद्यार्थ्यांसाठी एस. टी. महामंडळाच्या मानव विकास मिशनच्या बसही आता धावू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्याकरिता शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे. विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशनच्या बसेस सुरु झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी आगारातून सात मानव विकासच्या बसेस देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गापूर्वी अशा एकूण ३५ बसेस धावत होत्या. आता प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालये सुरू झाली असल्याने जिल्ह्यातील पूर्वी सुरू असलेल्या मानव विकास मिशन अंतर्गत एस. टी. बस पुन्हा धावू लागल्या आहेत. या बसमधून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येतो. प्रत्येक शाळेकडून विद्यार्थिनींची यादी प्राप्त होताच त्यानुसार एस. टी. आगारातून मानव मिशन बसेस मंजूर करण्यात येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना गेल्या अनेक दिवसांपासून या सेवेचा चांगला लाभ होत आहे.
बॉक्स .
कोरोनापूर्वी धावत होत्या मानव विकासच्या ३५ बसेस
ग्रामीण भागातून शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. यामधून नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करु दिला जातो. मात्र, २३ मार्चपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार मानव विकास व एस. टी.च्या इतरही बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाआधी मात्र जिल्ह्यातील सर्व बसेस धावत होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एस. टी. बसेस धावत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच मानव विकास मिशनच्या बसेस शाळा सुरू झाल्याने पुन्हा धावू लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे.
कोट
विद्यार्थिनींसाठी सुरु केलेल्या मानव विकास मिशन अंतर्गतच्या एस. टी. बसेस सुरू झाल्या आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, कधी-कधी या बस वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे आम्हाला शाळेत पोहोचण्यास उशीर होतो.
विद्यार्थिनी.
कोटकोट
विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर अशी मानव विकास मिशन अंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा सुरु आहे. अनेक बस सध्या सुरू झाल्या आहेत. पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे पास लवकर काढावेत, त्यामुळे उर्वरित बसेसही लवकरच सुरू करता येतील. - आगारप्रमुख, भंडारा