संतोष टकले : विश्वाचे अंतरंग व मानवी प्रगती विषयावर व्याख्यानभंडारा : मानवापासून कितीतरी दूरवर असलेले ग्रहगोल मानवाचे आयुष्य नियंत्रित करीत नाहीत. मानवाने बुध्दी आणि विज्ञानाच्या सहाय्याने स्वत:ची प्रगती करुन दूरवरचा पल्ला गाठला असल्याचे प्रतिपादन भाभा संशोधन केंद्राचे अणुशास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांनी केले. ते भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह भंडारा येथे विश्वाचे अंतरंग व मानवी प्रगती या विषयावर भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र मुंबईचे अणुशास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांच्या स्लाईड शो व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक रंजना वैद्य या होत्या. याप्रसंगी सूर्यमाला, पृथ्वीची उत्पत्ती या विषयीची माहिती स्लाईड शोद्वारा सांगताना डॉ. टकले पुढे म्हणाले, विश्वाची उत्पत्ती १३.८ अब्ज वर्षापुर्वी झाली आहे. तर २५ लाख वर्षापुर्वी मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली. मानवाने कार्यकारणभावाच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती केली. विज्ञानाच्या नवनवीन शोध संशोधनाच्या माध्यमाने मनुष्य आज जगावर अधिराज्य गाजवित आहे. मात्र भारतात आजही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार झालेला नाही. भारतीयांनी विज्ञानाची सृष्टी तेवढी घेतली पण दृष्टी घेतली नाही. आजही जाती धर्माच्या कर्मकांडात येथील पिढी अडकली आहे. गॅलिलीओ यांनी ४०० वर्षापूर्वी सूर्यकेंद्री सिध्दांत मांडला होता पण त्याला धर्मसत्तेने पाखंडी ठरवून अंधार कोठडीत डांबले. आयुष्याच्या शवेटी तो आंधळा झाला होता. कालांतराने जगाला सूर्यकेंद्री सिध्दांत मान्य करावा लागला.याप्रसंगी डॉ. टकले यांनी विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान करुन विश्वनिर्मितीचे रहस्य सांगून आकाशगंगेचे दर्शन घडविले. या कार्यक्रमाचे संचालन मअंनिसचे प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. आभार छाया कावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सतीश घोरपडे, अनंत कावळे, डॉ. आंबेडकर वसतीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थीनींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
विज्ञानाच्या साह्याने मानवाने साधली प्रगती
By admin | Published: February 02, 2017 12:18 AM