चरण वाघमारे यांची पत्रपरिषद : प्रकरण मोहाडी येथीलभंडारा : सहावर्षापुर्वीच्या एका घटनेत तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख व अशफा सैय्यद यांनी चरण वाघमारे यांना शिवीगाळ करणे, पोलीस कोठडीत ठेवणे व अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी मानवधिकार आयोगाने दंड ठोठावला आहे. याप्रकरणी आमदार चरण वाघमारे यांना एक लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी असे आयोगाचे आदेश आहे. या आशयाची माहिती आज दुपारी १२ वाजता आयोजित वार्ताहर परिषदेत आमदार चरण वाघमारे यांनी दिली.वाघमारे यांच्या माहितीनुसार, २००९ मध्ये बेटाळा या गावात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैगीक अत्याचाराच्या घटनेची चौकशी करण्याकरिता त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य असलेले चरण वाघमारे मोहाडी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी वाघमारे यांना शिवीगाळ, मारहाण व पोलीस कोठडीत ठेवून अपमानास्पद वागणूक दिली. याची तक्रार वाघमारे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली. आयोगाने तक्रार नोंदवून चौकशी सुरु करुन अतिरिक्त मुख्य सचिव गृहविभाग मुंबई यांना अनिल देशमुख व अशफा सैय्यद यांच्या विरुध्द सहा आठवड्यांच्या कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्या प्रकरणात चरण वाघमारे यांच्यासह इतर दोघांना जामीनावर सोडण्यात आले होते. आयोगाने संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेतली. तसेच आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रकरणाचा संदर्भ देत आदेश पारित केला. चरण वाघमारे यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक देशमुख व सैय्यद यांच्यावर कारवाई करुन एक लक्ष रुपयांची भरपाई देण्याचे आदेश पारित केला आहे. दीड महिन्याचा आत सदर रक्कम न दिल्यास १२.५ या दराने व्याज द्यायचा निर्देशही आयोगाने गृह विभागाला दिले आहे, अशी माहितीही आ. वाघमारे यांनी दिली. (प्रतिनिधी)
तत्कालीन पोलीस निरीक्षकांना मानवधिकार आयोगाचा दणका
By admin | Published: November 05, 2016 12:38 AM