समस्या : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष भंडारा : बेरोजगारीवर मात करुन बीअर शॉपीचा व्यवसाय करणाऱ्या युवकावर बीअर पुरवठ्यात अनियमिततेमुळे उपासमारीचे संकट ओढावले आहे. यासंबंधी राज्य उत्पादन शुल्क विभागाला अनेकदा तक्रार केली मात्र त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत असे की लाखनी तालुक्यातील धाबेटेकडी येथील शरद मेश्राम या युवकाने चार जणांकडून आर्थिक मदत घेऊन लाखनी येथे बीअरचा व्यवसाय थाटला. जिल्हास्तरीय कमिटीने या बीअर दुकानाला मंजुरी दिली. त्यानुसार व्यवसाय सुरु करण्यात आला. व्यवसाय करताना अनुज्ञप्तीधारकांकडून बीअर व रेडवाईन खरेदी करणे बंधनकारक आहे. बीअर दुकानाला नागपूर येथील सात अनुज्ञप्तीधारक पुरवठा करतात. मात्र अनुज्ञप्तीधारक कोणत्याही प्रकारची मागणी, पत्र, पूर्वसूचना न देता पुरवठा करतात. सावकारी पध्दतीने वसुली करतात. स्वत:च्या मर्जीने व्यवसाय करीत आहेत. दूरध्वनीद्वारे मागणी केली असता पुरवठा केल्या जात नाही. बीअर दुकानदाराने दिलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न शरद मेश्राम यांनी संबंधित विभागाला दिलेल्या निवेदनातून केला आहे. व्यावसायिकांची समस्या सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. या व्यवसायात येणाऱ्या अडचणीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी शरद मेश्राम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बीअर व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट
By admin | Published: December 31, 2014 11:20 PM