प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : लग्न आणि वाढदिवस हे प्रत्येकांच्या आयुष्यातील एक आनंदाच्या पर्वणीचा दिवस. वाढदिवसाच्या तयारीसाठी घरातील थोरामोठ्यांपासून सर्वांचीच लगबग बघायला मिळते. अशा कार्यक्रमाला घरात पाहूणे, मित्रमंडळींची रेलचेल असते. त्यात आपल्या लहानग्यांच्या वाढदिवसांची मजा काही औरचं. मात्र, तुमसर तालुक्यातील नवरगांव येथील पाठराबे कुटुंबाने त्यांच्या एक वर्षीय चिमुकलीचा साजरा केलेला वाढदिवस सर्व पालकांसाठी आदर्श ठरला आहे.तुमसर तालुक्यातील नवरगाव येथे ग्रामपंचायतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर नागरिक उघड्यावर शौचास जात होते. मात्र, काही दिवसापूर्वीच या गावातील उघड्यावर जाणाºयांना बंदी घातली. त्यामुळे एकेकाळी ज्या जागेमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. तीच जागा आता सर्वांसाठी आल्हाददायी ठरली आहे. हागणदारीमुक्तीच्या जागेवर गावातीलच पाठराबे कुटुंबियांनी त्यांच्या एक वर्षाची मुलगी कनिरा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्य परिसरातील वाटसरूंसाठी प्याऊची व्यवस्था केली आहे. काही दिवसांपूर्वीच हागणदारीची ही जागा ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी, लोकसहभागातून पुढाकार घेवून आठवडाभरात स्वच्छ करून नागरिकांचे स्वच्छतेकडे लक्ष वेधले. हागणदारीमुक्तीच्या जागेवर प्याऊची व्यवस्था केल्याने येथून मार्गक्रमण करणाºया वाटसरूंची तृष्णा भागणार आहे.पाठराबे कुटुंबियांच्या पुढाकारातून लागलेल्या प्याऊच्या आगळया वेगळया उपक्रमाने शाश्वत स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे.रोहित पाठराबे यांनी या ठिकाणी आधुनिक शेतीची कास धरली आहे. लोकसहभागातून त्या जागेची स्वच्छता करून ती जागा गोदरीमुक्त केली. या सामाजिक उपक्रमाने पाठराबे कुटुंबिय प्रभावित झाले. शाश्वत स्वरूपात स्वच्छता राहावी याकरिता रोहित व ईशा या पाठराबे दाम्पत्यांनी मुलगी कनिराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक दायित्यातून प्याऊ लावण्यासाठी पुढाकार घेतला.सर्वांगसुंदर झाली गोदरीची जागानवरगाव येथे तुमसर व उमरवाडा मार्गा लगत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हागणदारी होत होती. तसेच घनकचºयाची मोठी समस्या होती. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नवरगाव येथील सरपंच संध्या गुरवे, उपसरपंच निलेश गुरवे, सचिव विद्या गजभिये, पोलिस पाटील मिनाक्षी लाडसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यनारायण कामथे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी दोन्ही ठिकाणची हागणदारीची स्वच्छता करण्याचा संकल्प केला व तो प्रत्यक्ष कृतीत उतरविला.या परिसरातील उमरवाडा, सितेपार, तामसवाडी, रेंगेपार पांजरा, वाहनी, परसवाडा येथील नागरिक, विद्यार्थी नवरगाव येथून तुमसरला जातात. चिमुकली कनिरा हिच्या वाढदिवसानिमित्य हागणदारीमुक्त जागेवर उभारण्यात आलेल्या प्याऊच्या माध्यमातून वाटसरूंची तृष्णा भागविली जाणार आहे. ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी हा पुढाकार घेतला.- रोहित पाठराबे, ग्रामस्थ, नवरगांव
हागणदारीमुक्त जागेतून वाटसरूंची ‘तृष्णातृप्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:31 PM
लग्न आणि वाढदिवस हे प्रत्येकांच्या आयुष्यातील एक आनंदाच्या पर्वणीचा दिवस.
ठळक मुद्देपाठराबे कुटुंबीयांचा पुढाकार : नवरगावात शाश्वत स्वच्छतेचा उपक्रम