मोहन भोयर
भंडारा : प्रत्येकाचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते; परंतु हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. शासकीय घरकुल प्राप्त करण्याकरिता तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे एका गरीब कुटुंबाला सुमारे ३५ वर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर दिव्यांग वृद्धेला मुलासह चंद्रमोळीत झोपडीतच वास्तव्य करावे लागत आहे. ड यादीतून ब यादीत नाव येण्याकरिता दप्तर दिरंगाई कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.
तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे इंदिरानगर येथे बैटवार यांचे कुटुंबीय चाळीस वर्षांपासून वास्तव्याला आहे. पती प्रल्हाद बैटवार यांनी घरकुल मिळावे याकरिता प्रयत्न केले होते. परंतु त्यांना घरकुल मिळाले नाही. त्यांचा मृत्यू झाला परंतु जिवंत असताना त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. अता त्यांची दिव्यांग वृद्ध पत्नी व मुलगा आजही चंद्रमोळी झोपडीत वास्तव्य करीत आहे. मात्र, घरकुलाचा लाभ मिळाला नाही. घरकुलासाठी त्यांनी रीतसर अर्ज केला. ड यादीतून ब यादी येण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
बैटवार कुटुंबातील सपना देवदास बैटवार, देवदास प्रल्हाद बैटवार व रामजी बैटवार यांचे वास्तव्य आहे. या भागातील अनेक नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. मात्र, बैटवार कुटुंब घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. दप्तर दिरंगाई, की स्थानिक गावातील राजकारण, यास कारणीभूत असा प्रश्न आहे. ड यादीतील नावे ब यादीत येण्यासाठी अनेक जण घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात बैटवार यांनी खंडविकास अधिकारी धीरज पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी या प्रकरणात आपण लक्ष घालणार, असे आश्वासन दिले.
मजुरीवर घरे कसे बांधणार?
बैटवार यांनी ऊन, पाऊस, वादळ, वारा यापासून बचावासाठी गवताची झोपडी तयार केली आहे. पावसापासून बचाव कसा करावा, असा प्रश्न रामजी यांना पडला आहे. थंडीच्या दिवसात वृद्ध आईला कमालीचा त्रास होतो. परंतु इलाज नाही, असे रामजी यांनी सांगितले. दररोज मजुरी करून उदरनिर्वाह केला जातो. महागाईच्या दिवसांत उदरनिर्वाह केल्यानंतर पैशाची बचत होत नाही. त्यामुळे स्वतःच्या पैशाने घर कसे बांधावे, असा प्रश्न आहे.