सौदेपूरच्या जंगलात सापडला मृतदेह : खुनाचा गुन्हा दाखलतुमसर : पत्नीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचा संतापजनक व अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार सोमवारी उघडकीस आला. सौदेपूर जंगलात महिलेचा सांगाडा सापडला. मृत महिलेची वस्त्रे, चप्पल व इतर साहित्य तिच्या आई व भावाने ओळखले. याप्रकरणी आरोपी पतीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वर्षीपूर्वी मिना जगने हिचा विवाह तेजू जगने (४०) रा.खमारी, ता.तिरोडा यांच्याशी झाला होता. सततच्या भांडणामुळे दोघांनी घटस्फोट घेतला होता. तत्पुर्वी ते दोघेही संत रविदास नगरात मिनाच्या भावाकडे राहत होते. घटस्फोटानंतर पत्नीला खावटी मंजूर झाले होते. त्याचा राग तेजूला होता. ८ डिसेंबर २०१६ रोजी न्यायालयाच्या तारखेवर उपस्थित राहण्याकरिता मीना घराबाहेर गेली. असता ती परत घरी आलीच नाही. त्यामुळे मिनाचा भाऊ राजेश भोंडेकर याने ११ डिसेंबरला तुमसर पोलीसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.१२ जानेवारी २०१६ ला तुमसर पोलीसांनी तेजू जगने याला अटक केली. १६ जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान पोलीसांनी हिसका दाखविताच आरोपी तेजू जगने याने पत्नी मिनाची हत्या केल्याचे कबुल केले. सोदेपुर जंगलात हत्या करुन मृतदेह फेकून दिले अशी माहिती तेजू ने दिली. सोमवारी तुमसरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र ठाकूर, आरोपी तेजू जगने, मृतक मुलीची आई, भाऊ राजेश भोंडेकर व पोलीस पथक सौदेपूर जंगलात गेले. जंगलात मिनाचा सांगाडा तेवढा शिल्लक होता. वन्यप्राण्यांनी देहाचे लचके तोडले होते. मिनाची आई व भाऊ राजेश भोंडेकर यांनी मीनाची साडी, चप्पल ओळखली. आरोपी पती तेजू जगने यांच्यावर भादंवि ३६४, ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय राजेंद्र ठाकूर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)आरोपी तेजू जगने याने पत्नी मीनाची हत्या केल्याचा कबुली जवाब नोंदविण्यात आला आहे. तेजूची दुसरी पत्नीसुध्दा या हत्याकांडात सहभागी होती अशी कबुली तेजूने दिली. त्यामुळे तिलाही अटक करून तपास करण्यात येईल. - राजेंद्र शेट्टे, पोलीस निरिक्षक, तुमसर.
पतीच निघाला मारेकरी
By admin | Published: January 17, 2017 12:13 AM