लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : पैशाच्या तगाद्यामुळे माहेरी निघून गेलेली पत्नी परतल्यावर तिच्या भाजीमध्ये विष टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली गावात घडली. सुदैवाने मुलाने हा प्रकार बघितल्याने त्याने आईला सांगितले. त्यामुळे पतीचा डाव फसला. दिव्या दिसाराम जांभूळकर (४०) असे पत्नीचे नाव असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती दिसाराम सोमा जांभूळकर (४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २५ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रानुसार, दिसारामने मे महिन्यात वडिलोपार्जित अर्धा एकर शेती विकली. विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी स्वतःच्या नावे असलेल्या बँक खात्यात २ लाख रुपये तर पत्नीच्या बँक खात्यात ३ लाख रुपये जमा केले होते. दिसारामने आपल्या खात्यामधून रक्कम काढून दुचाकी खरेदी केली. लोकांकडून घेतलेले कर्ज परत केले व उर्वरित रक्कम दारू पिण्यात खर्च केल्याची पत्नीची तक्रार आहे. स्वतःच्या बँक खात्यातील पैसे संपल्यावर त्याने पत्नीच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी तगादा सुरू केला. त्यासाठी दारू पिऊन शिवीगाळ करून मारपीट सुरू केली. १२ सप्टेंबरला पत्नीला मारझोड करून घराबाहेर काढले. त्यामुळे दिव्या दोन मुली व एका मुलासह माहेरी निघून गेली. पाच दिवसांपूर्वी ती घरी परतली होती. दिसाराम दोन दिवस पत्नीसोबत चांगला राहिला; मात्र पुन्हा पैशाची मागणी सुरू केली.
घटनेच्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. मुलगा. दिव्या व दिसाराम तिघे जण घरी होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास, 'मला पैसे देत नसशील तर मी घरचे तांदूळ विकतो', असे बोलून तांदूळ उचलण्यासाठी गेला. मात्र, पत्नीने रोखल्याने त्याने तिचा हात मुरगळून शिवीगाळ केली व घराबाहेर निघून गेला.
थोड्या वेळात घरी परतल्यावर दिव्याने त्याला जेवण वाढले. त्याच्या जेवणानंतर दिव्या अंघोळीला गेली असता दिसारामने उरलेल्या भाजीमध्ये धानावर फवारणीचे लाल रंगाचे औषध टाकले. पत्नी दिव्याच्या तक्रारीवरून दिसारामच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी भाजी ताब्यात घेतली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानू रायपुरे करीत आहेत.
असा उघडकीस आला प्रकार पत्नी अंघोळीला गेली असता दिसारामने मुलाला कोंबडा सुटला का, हे पाहायच्या बहाण्याने घराबाहेर पाठवले. मात्र, कोंबडा सुटला नसल्याने मुलगा लगेच माघारी आला असता वडील भाजीत धानावर फवारण्याचे औषध टाकत असल्याचे त्याने पाहिले. मुलगा आल्याचे पाहून दिसारामने त्याला पुन्हा खर्रा आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठविले. मात्र, मुलाने डब्यातील भाजी खाऊ नको, असे सांगून आईला सावध केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.