अशोक पारधी
पवनी (भंडारा) : चहा तयार करताना अचानक गॅस गळती होऊन उडालेल्या भडक्याने पती-पत्नीसह मुलागा जखमी झाल्याची घटना पवनी येथील शुक्रवारी वार्डात सोमवारी सकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
लेकराम रामचंद्र ढेंगरे (५०) पत्नी पुष्पा लेकराम ढेंगरे (४५) व मुलगा स्वप्निल लेकराम ढेंगरे (२६) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी सकाळी चहा बनविण्यासाठी लेकराम यांनी गॅस सुरू केला. त्यावेळी अचानक गॅस गळती होऊन भडका उडाला. त्यात त्याचे हाताला भाजले. घरातून पत्नी पुष्पा व मुलगा स्वप्निल स्वायंपाक घरात धावत आले, तेव्हा भडक्याच्या ज्वाळांनी त्यांना किरकोळ जखमा झाल्या.
त्यांना पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे भाजलेल्यांवर उपचाराची सुविधा नसल्याने लेकराम यांना नागपूर येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला देण्यात आला. सिलिंरमधून गॅस गळती होत आल्याची माहिती लेकराम यांनी गॅस सिलिंउर पोहचविण्यासाठी आलेल्या भावना इंडेनच्या कामगाराला दिली होती. परंतू त्याने काळजी घेतली नाही असे कुटुंबीयांनी सांगितले.