भंडारा : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान लागवडीचा खर्चही निघत नसल्याने हतबल झालेल्या नरोडी येथील शेतकऱ्याने घराच्या परसात हळदीच्या पिकाची लागवड करून अवघ्या एक गुंठा पिकातून एक क्विंटल पाच किलो हळदीचे उत्पन्न घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. धान पीक प्रमुख असलेल्या जिल्ह्यात पारंपरिक शेतीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. भंडारा तालुक्यातील नेरोडी येथील अभिमान नारायण निंबार्ते यांनी आपल्याजवळ असणाऱ्या दोन एकर शेतीत केवळ एक गुंठा क्षेत्रात प्रयोग करून हळदीची लागवड जून महिन्यात केली होती. घरी दोन गाई, चार म्हशी असल्याने त्यांनी लागवडीपूर्वी भरपूर शेणखत टाकून मशागत केली होती. वेळोवेळी निंदणी व लागवडीपूर्वी शेणखत मिसळून टाकल्याने हळदीचे पीक चांगलेच बहरले होते. हळद लागवड करताना त्यांनी गादी वाफ्यावर लागवड केली होती. फेब्रुवारी महिन्यात हळद पीक काढणीला आल्याने त्यांनी हळद काढली व त्यानंतर ती उन्हामध्ये सुखवत घरीच पत्नी उत्तरा निंबार्ते यांनी बारीक करून चक्कीतून बारीक करून हळद पावडर तयार केली. त्यानंतर पत्नी उत्तरा व नारायण निंबार्ते यांनी घरीच एकेक एक किलोचे पॅकिंग तयार करून भंडारा येथे घरोघरी विक्री केली. अभिमान निंबार्ते यांचा दुधाचा व्यवसाय आहे. घरी म्हशी, गाई असल्याने ते दररोज भंडारा येथे दूध घालण्यासाठी येतात. त्यामुळे आधीच त्यांच्या ओळखी असल्यामुळे नव्याने ग्राहक शोधण्याची गरज भासली नाही. दूध देताना प्रत्येक घरोघरी हळद विक्री केली. हळदीची असणारी गुणवत्ता पाहून किराणा दुकानातही हळदीची मागणी वाढली. एका ग्राहकाने तर तब्बल २५ किलोची मागणी केली. त्यामुळे त्यांना दोनशे रुपये प्रतिकिलो दर मिळाला. अभिमान निंबार्ते यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. मात्र, या धान शेतीतून एका एकरातून जेवढे उत्पन्न मिळाले नाही, तेवढे उत्पन्न अवघ्या या गुंठाभर हळद लागवडीतून मिळाल्याचे निंबार्ते यांनी सांगितले. त्यांना एक क्विंटल हळद पावडर तयार करून विक्रीसाठी अवघा दीड हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले. त्यातही हळद घरच्याघरी बारीक करून त्याचे एक किलो पॅकिंग तयार केले. त्यामुळे पुढील वर्षी किमान एक एकर तरी लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हळदीचे एकरी उत्पन्न किमान दोन लाखांपर्यंत तरी मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. किमान पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न झाले तरी देखील शेतकऱ्यांना लाखाच्यावर उत्पन्न होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी कोरोना परिस्थितीमुळे हळद, आले या पिकांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे घरोघरी हळद हवी आहे का विचारताच ग्राहकांनी हळदीला पसंती दिली. त्यामुळे हळद हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. हळद पीक लागवड साधारणत: जूनमध्ये करतात. या पिकाचा कालावधी दहा महिन्यांचा असतो. एक एकर हळदीची लागवड करण्यासाठी आठ ते नऊ क्विंटल बेणे लागते. इतर पिकांपेक्षा हळद पिकाला खर्चही कमी लागत असल्याने शेतकऱ्यांना हळद पीक वरदान ठरू शकते.
बॉक्स
कमी खर्चात होते जास्त उत्पादन
हळदीचे पीक हे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे जिल्ह्यात हळद लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी फायदा घेऊन आर्थिक प्रगती साधायला हवी. धान पिकासारखा हळदीला प्रचंड फवारणीचा खर्चही येत नसल्याने हळद पीक हे खरोखरच फायदेशीर ठरत आहे.
कोट
मी दरवर्षीच थोडी हळदीची लागवड करत होतो. यावर्षी घराजवळच लावलेल्या एका गुंठ्यात हळद लागवडीतून खर्च वजा जाता मला वीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. धानाच्या एक एकरातही तेवढे पैसे राहत नाहीत. त्यामुळे हळद नक्कीच परवडते.
अभिमान निंबार्ते, शेतकरी नेरोडी, ता. भंडारा
हळद हे पीक बहुगुणी औषधी व आहारात नेहमी वापर होणारे पीक असल्याने हळदीला वर्षभर प्रचंड मागणी असते. कोरोना संसर्गामुळे हळदीची मागणी वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना हळद पिकाचा खर्चही कमी होतो व फायदेशीर होते.
अविनाश कोटांगले,
तालुका कृषी अधिकारी भंडारा