नीलिमा डेकाटे यांची नीलिमा टायपिंग इन्स्टिट्यूट ही नगरपंचायत मोहाडीच्या संकुलातील ज्या खोलीत आहे, ती खोली देवदास गिरीपुंजे यांना भाड्याने देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी नीलिमा डेकाटे यांना टायपिंग इन्स्टिट्यूट चालविण्यासाठी दिली. आता ती खोली नीलिमा डेकाटे यांनी रिकामी करून द्यावी यासाठी तगादा लावला जात होता. मात्र खोली रिकामी करण्यास नीलिमा हिने नकार दिल्याने वाद वाढला. नीलिमा डेकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ सप्टेंबरच्या रात्री सुनील गिरीपुंजे यांनी टायपिंग इन्स्टिट्यूटच्या दाराला मी लावलेले कुलूप तोडून स्वतःचे कुलूप लावले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर पोलीस ठाणे मोहाडी येथे तक्रार द्यायला गेले. पोलिसांनी माझी तक्रार न घेता खूप वेळपर्यंत बसवून ठेवले. जोपर्यंत सुनील गिरीपुंजे येत नाहीत, तोपर्यंत रिपोर्ट घेणार नाही, असे सांगितल्याने मी परत आले. त्या नंतर तुम्ही आपली तक्रार परत घेत असाल तरच तुमची इन्स्टिट्यूट सुरू होईल असे सांगितल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून व पुढे परीक्षा असल्याने मी आपली तक्रार परत घेतली.
नीलिमा डेकाटे यांच्या प्रकरणात खोली नगरपंचायतची, भाड्याने दुसऱ्यालाच दिली आहे, राहतो दुसराच, तक्रार तिसऱ्याच व्यक्तीविरुद्ध असल्याने प्रकरण समजून घेण्यासाठी गिरीपुंजे यांना बोलावण्यात आले होते. पोलिसांनी मोक्क्यावर जाऊन चौकशी केली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
कोट
देवदास गिरीपुंजे यांना खोली भाड्याने देण्यात आली आहे. त्या खोलीशी माझा काहीही संबंध नसताना समोर होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विरोधकांनी महिलेला मोहरा बनवून माझी बदनामी करण्याचा कट रचला आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत हे मी पुढे सिद्ध करून दाखवून देईन.
सुनील गिरीपुंजे, माजी उपाध्यक्ष, नगरपंचायत, मोहाडी
कोट
देवदास गिरीपुंजे यांना खोली भाड्याने दिली असल्याची दप्तरी नोंद असून, त्यांच्या सोबत करारनामा करण्यात आला आहे. नीलिमा डेकाटे यांनी दिलेल्या निवेदनावर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई नियमानुसार करण्यात येईल.
गजानन नरवाळे
प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत मोहाडी.