लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रात्रीच्या सुमारास एखाद्या रस्त्यावर तीन ते पाच संख्येने उपस्थित असलेले काही इसम भांडण करीत असतील तर तिथे थांबू नका. खराेखर वाटणारे हे भांडण फक्त इसमांना खिळवून ठेवून नंतर त्यांना लुटण्याचा हा सर्व खेळ असताे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण कुणी वाद घालत असेल तर त्यात मध्यस्थी किंवा स्वत:ही वाद घालू नका.
महानगरात असे प्रकार उघडकीला आल्यानंतर पाेलीस विभागही सतर्क झाला आहे. या संदर्भात पाेलीस प्रशासनाने नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. रात्रीच्या सुमारास मुख्य मार्गाला जाेडणाऱ्या रस्त्यावर असे प्रकार घडले आहेत. भंडारा शहरात असा प्रकार घडला नसला तरी लुटणाऱ्यांनी ही नवीन शक्कल शाेधून काढली आहे. किंबहुना कधी ओळखणाऱ्या इसमांकडूनच विनाकारण वाद घातले जातात. यामधूनच लहानसहान घटनाही घडत असतात. कधी याचे पर्यवसान माेठ्या घटनेत हाेत असते. त्यामुळे अशा भानगडीत पडू नये, असा सल्लाही पाेलीस विभागातर्फे देण्यात येताे.
असे तुमच्याही बाबतीत घडू शकते
रात्रीच्या सुमारास टाेळीने किंवा सुनसान रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने थांबविल्यास किंवा जाेरजाेराने भांडण करीत असल्यास तिथे थांबू नका. थांबल्यास मध्यस्थी करण्याचीही तयारी करू नका. ही फक्त तुम्हाला फसवण्यासाठी एक चाल असू शकते. वेळीच सावध पवित्रा घेऊऊन तिथून निघून जाणे याेग्य आहे.
ग्रामीण भागात सहसा असे प्रकार घडत नसले तरी तालुक्यात मुख्यालयांना जाेडणाऱ्या रस्त्यांवर विशेषत: महामार्गावर असे प्रकार घडले आहेत. मुंबई-पुण्यातील थरारनाट्यही घडले आहेत. यात अनेकदा खून व लुटण्याचे प्रकारही झाले आहे. परिणामी आपल्याबाबत असे घडू नये म्हणून सावधान राहणे गरजेचे आहे.
काय काळजी घ्याल?
जिल्हा पाेलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, रात्रीच्या सुमारास खूप महत्त्वाचे कार्य असल्यास एकटे बाहेर पडण्यापेक्षा दाेनजण जाणे कधीही चांगले आहे. कुणावरही एकदम विश्वास करण्यापेक्षा पाेलीस हेल्पलाईन किंवा टाेल क्रमांकावर संपर्क साधावा. संशयित असल्यास त्याची तात्काळ सूचना पाेलीस विभागाला द्यावी.