इंद्रपाल कटकवार
भंडारा : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावाच्या अस्मितेचा प्रश्न. कोणत्याही परिस्थितीत आपल्या गटाला निवडून आणून गावावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपड. यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला जातो. त्यातच निवडणूक म्हटली की ग्रामीण भागात दारूचा महापूर वाहतो. मात्र आता सोशल मीडियावर या निवडणुकीत गावात वाटली दारू तर उमेदवाराला नक्की पाडू, असा संदेश व्हायरल होत आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी तयार केलेला हा संदेश आता जिल्हाभर व्हायरल होत आहे.
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. १,२३६ जागांसाठी २,७४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारपासून या निवडणुकीची रणधुमाळी गावागावांत सुरू झाली आहे. प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे समर्थक या निवडणुकीची जय्यत तयारी करीत आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. निवडणूक गावाची असली तरी रंगत मात्र लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही मोठी आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागात दारूचा महापूर वाहतो. उमेदवार मतदारांना आकृष्ट करण्यासाठी दारूचे वाटप करीत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.
अलीकडे सोशल मीडिया सर्वत्र सक्रिय आहे. ग्रामीण भागही त्याला अपवाद नाही. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. सोशल मीडिया आणि ग्रामपंचायत निवडणूक यामुळे वेगळी राहणार तरी कशी. प्रचारासोबतच विविध गमतीजमतीही सोशल मीडियावरून निवडणुकीसंदर्भात व्हायरल होत आहेत. गावाची निवडणूक असली तरी अनेक गटांनी व्हाॅटसॲपवर आपले ग्रुप तयार केलेले आहेत. या माध्यमातून प्रचाराची रणनीती आखली जात आहे. प्रचारासोबतच काही समाजप्रबोधनात्मक संदेशही व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणूक सुदृढ वातावरणात व्हावी, अशी प्रशासनासोबतच गावातील अनेकांची इच्छा असते. परंतु दारूमुळे निवडणुकीला गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच जर गावात वाटली दारू तर उमेदवाराला नक्की पाडू, हा संदेश व्हायरल होत आहे. गावागावांत सोशल मीडियावरून हा संदेश पाठवून दारूबंदीसोबतच समाज प्रबोधनात्मक संदेशही दिला जात आहे.