n लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिक पोलीस ठाण्यात फिरायला येत नाही. कोणती तरी समस्या घेवूनच येतात. आपण प्रत्येक पोलीस ठाण्याला सूचना दिली असून प्रत्येकाचे गऱ्हाने ऐकून घेतले जाते. नागरिकांनी कोणतीही समस्या असेल तर बिनधास्त पोलीस ठाण्यात जावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या ठिकाणी बसविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. अलीकडे घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहे. गावठी दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. आपण रूजू झालो तेव्हापासून ७५ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. नागरिकांचेही यासाठी मोठे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक ठाणेदाराला आपण सूचना दिली आहे. ठाणेदार समस्या ऐकून घेत नसेल तर उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे जावे परंतु तेथेही समाधान होत नसेल तर थेट आपल्याकडे यावे, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य दिले आहे. लवकरच जिल्ह्यातील गुन्हेगारांचा बिमोड करून शांतताप्रीय भंडारा जिल्ह्याच्या नावलौकीकात भर घालू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करून शांतता प्रस्थापित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले.
रेतीतस्करी रोखण्यासाठी पथकभंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचे खरे काम महसूल प्रशासन आणि खनिकर्म विभागाचे आहे. पोलीस त्यांना संरक्षण देवून सहकार्य करते. यासाठी जिल्ह्यात पोलीस पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारातील वाहतूक समस्या सुरळीत होईल भंडारा शहरासह जिल्ह्यातील वाहतूक समस्येवर कायम तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी काय उपाययोजना करावयाच्या याच्या सूचना दिल्यात.