गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे, एवढी काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय सर्वांसाठी कोरोनाची लस सुरक्षित आहे व तसे आतापर्यंतच्या अभ्यासातून निष्पन्नही झाले आहे. काही व्यक्तींना लसीची ॲलर्जी असते किंवा काही व्यक्तींना लस घेतल्याने रिॲक्शन होते असे प्रकार घडतात. यात कोरोना लसीमुळेच त्यांच्यासोबत असे होणे शक्य नसून अन्य औषध किंवा लसींमुळेही तसे होते. यामुळेच नागरिकांना लस घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रातच अर्धा तास थांबून राहण्यास सांगितले जात आहे. यासाठी केंद्रात बसण्याची व बेडचीही व्यवस्था केली जात आहे.
मात्र काही व्यक्ती आम्हाला काहीच होत नाही असा आव आणून लस घेतल्यानंतर लगेच निघून जातात. कित्येकदा काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर भोवळ येणे, डोकेदुखी, मळमळ, अंगावर खाज, श्वास घेण्यास त्रास होणे असे रिॲक्शन होत असते.
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी ?
कोरोना लस ही अत्यंत सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर केंद्रातून बाहेर पडल्यावर असले प्रकार घडून संबंधितांची धावपळ होऊ नये किंवा काही धोका होऊ नये यासाठीच केंद्रात अर्धा तास बसणे गरजेचे आहे. आतापर्यंत कुणालाही काही त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, अंगावर खाज, मळमळ, भोवळ येणे यासारखे परिणाम दिसून येतात. मात्र हे परिणाम काही वेळापुरतेच असतात. एखाद्या व्यक्तीला काही जुना त्रास असल्यास किंवा लसींची रिॲक्शन असल्यास ते बेशुध्द होऊ शकतात किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. म्हणून लसीकरणानंतर अर्धा तास थांबावे.
लस ही रामबाण औषध
कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसी अत्यंत सुरक्षित असून, त्यांच्या संपूर्ण चाचण्या करूनच वापराला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, भोवळ व अंगदुखी तसेच ताप येण्यासारखे त्रास होतात. मात्र हे काही वेळापुरतेच राहत असून यापासून घाबरण्याचे कारण नाही.
लसीकरणात ज्या गावांचा प्रतिसाद कमी होता अशा ठिकाणी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली. १८ वर्षावरील नागरिकांनी जिल्हाभरात १६७ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण, उपजिल्हा व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश लसीकरणासाठी केला आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी.
- डॉ. प्रशांत उईके