पालांदूर : संकट अस्मानी असो की सुलतानी. पोटासाठी घराबाहेर पडावेच लागते, शेतात राबावेच लागते. हातावर पोट असले, मजूर कोरोनाच्या सावटातही शेतशिवारात राबत आहेत. कोरोनाने सर्वांना भयभीत केले असले, तरी मजुरांना घाबरून चालेल तरी कसे. शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार, अशी व्यथा धानाच्या शेतात राबणाऱ्या मजुरांनी सांगितली.
शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज रुग्ण आढळून येत आहेत. आप्त स्वकियांच्या मृत्यूच्या वार्ताही धडकत आहे. संचारबंदीने संपूर्ण नागरिक घरात थांबले आहेत. मात्र, हातावर पोट असलेले गाव खेड्यातील मजूर या संकटातही शेतात राबताना दिसत आहे. सध्या शेतशिवारात उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे. रखरखत्या उन्हात मजूर धानाची कापणी करीत आहे. कोरोना नियमांचे पालन आणि ताेंडाला मास्क लावून मजूर शेतात राबत आहेत. घरी असलेल्या चिल्यापिल्यांची चिंताही त्यांना सतावत आहे. आरोग्याची काळजी घेत भीतीच्या सावटात मजूर राबत आहे. गीताबाई राऊत म्हणाल्या, कोरोना असो की आणखी काही, आम्हाला राबल्याशिवाय पर्याय नाही. गरिबीपुढे कोरोनाचेही भय संपले आहे. शेतात राबलो नाही, तर आम्हाला उपाशीच राहावे लागेल. कोरोना झाला, तर सरकारी दवाखाना आहे, परंतु आम्हाला कोरोना होणारच नाही. आम्ही नियमाचे पालन करतो, असे त्या सांगत होत्या.
रमेश ठवकर म्हणाले, कोरोना संकटाने आम्ही घाबरलो, तर उपाशीच राहावे लागेल. सरकारने मदतीचा हात दिला, पण त्यात कुटुंबाचा गाढा ओढायचा कसा, शेतात राबूनच दोन घास पोटात जातील. वर्षभर राबणे हेच आमच्या नशिबी असल्याचे रमेश सांगत होता.
बॉक्स
वीतभर पोटासाठी कोरोनाशी दोन हात
शेतीचा आधारच मजूर आहे. मजूर शेतात राबला नाही, तर शेतातील धान्य शेतकऱ्याच्या घरी पोहोचणार नाही. सध्या शेतशिवारात धान काढणीला आला आहे. कोरोनाच्या सावटात शेतकरी मजुरांकडून काम करून घेत आहे. संकट कोणतेही असो, वीतभर पोटासाठी सामना करावाच लागतो. शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहे, परंतु या योजनांचा लाभही अनेक मजुरांना मिळत नाही. शासन आणि प्रशासनाच्या योजना अशिक्षितपणामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.