साधे त्या कुटुंबाचे सांत्वन करण्याचे सौजन्य नाही. अरे नका देऊ मदत, पण एकदाचे हे कायद्यात बसत नाही, असे सांगून मोकळे व्हा ना. कशाला त्या कुटुंबीयांना मदतीसाठी खर्डेघाशी करून कागद रंगवायला भाग पाडताय. बिचारे तुमच्या आशेवर दिवस काढत आहेत. मदत देण्याचं धोरण शासनाचं आहे, मग प्रशासनाला अडचण कसली. यावरून “चहापेक्षा किटली गरम” असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर हे जंगलात वसलेले छोटेसे आदिवासी गाव. या गावात मेश्राम कुटुंबीय गुण्या-गोविंदाने नांदत होते. या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली, कुणास ठावूक. २२ जून २०२० रोजी नीताराम ऋषी मेश्राम हा अर्धांगिनी चंद्रकला व मुलांसह शेतात गेला होता. निसर्गचक्र किंवा महावितरणच्या रूपात “यमराज” आपली वाट बघतोय, अशी पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. पाऊस येईल, या लगबगीने तो सहकुटुंब शेतातून परत येत होता. पुढे कारभारीण व मोठा मुलगा, तर पाठीमागून लहान मुलासह तो गुरेढोरे घेऊन येत होता. वाटेत रस्त्याच्या कडेला विजेचा खांब होता. खांबाच्या तणावाला जिवंत वीजप्रवाह होता. तणावाजवळून जाताना त्याला हलकासा विजेचा धक्का बसला. क्षणार्धात तो तणावाला चिकटला. काळाने त्याच्यावर झडप घातली. त्या अभागिनीचं कुंकुच पुसलं गेलं. काय रस्त्याने जाणे त्याची चूक होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे हृदय द्रवत नाही, ही खरी शोकांतिका आहे. प्रशासनाच्या मोठमोठ्या हुद्द्यांवर जी मंडळी बसली आहेत, ती स्वतःला शेतकरी पुत्र आहे म्हणून अभिमानाने सांगतात. मात्र ज्यावेळी शेतकऱ्याला मदत देण्याचा विषय येतो, तेव्हा यांच्या संवेदनाच मृत पावतात, पण असे का घडते. हा आरामदायी खुर्ची व वातानुकूलित संयंत्राचा परिणाम तर नाही ना? यावर संशोधनाची गरज आहे. विभागाच्या चुकीमुळे एखादी व्यक्ती मृत पावणे यांच्यासाठी अगदी सहज आहे, पण त्या मृताच्या कुटुंबीयांना काय वेदना, हालअपेष्टा होतात, त्याची जाणीव त्यांना नाही. वीज खांबाच्या तणावाला जिवंत वीजप्रवाह कसा आला. याची चौकशी केली? का यात दोषी असणाऱ्यांवर काय कारवाई केली? याचे उत्तर अजूनही सापडत नाही.
बॉक्स
मदतीसाठी विधवेची फरफट सुरूच
मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून आर्थिक मदत दिली जाते, असं कुणीतरी त्यांना सांगितलं. त्या विधवेनं कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्यासाठी खर्चही केला. अर्जुनीच्या महावितरण कार्यालयात ती कागदपत्रे जमा केली. आज मदत मिळेल, उद्या मिळेल, या प्रतीक्षेत नऊ महिने लोटले. महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजविणे सुरूच आहे. आशाळभूत अपेक्षेने घराबाहेर पडायचे, महावितरणच्या कार्यालयात पोहोचून विचारपूस करायची. मदत मिळेल हे नेहमीचे उत्तर ऐकून कान बधिर झाले. हे ऐकून नैराश्याने परत यायचे. हा जणू त्यांचा दिनक्रमच झाला आहे.