भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनावर मास्क हेच प्रभावी औषध असल्याचे वारंवार सांगूनही सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत. हे जबाबदार नागरिकाचे वर्तन नसून यामुळे आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे अन्य जिल्ह्यात प्रशासनाला नाईलाजाने टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना टाळेबंदी नको असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये, बाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे. धार्मिकस्थळी, पर्यटनस्थळी किंवा इतर कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पाडावेत, वारंवार उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करावे तथा प्रत्येक बाबीसाठी निर्गमित आदेश, परिपत्रक व प्रमाणित कार्यप्रणालीची कडक अंमलबजावणी करावी. सदरील नियमांचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार जिल्ह्यात कोविड लसीकरण सुरू झाले असून, ६० वर्षांवरील लाभार्थी व विशेष आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. शासकीय व खासगी अशा ४० केंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरणदरम्यान लस देण्यात येत आहे. नागरिकांनी गर्दी न करता नियमांचे पालन करून कोविड लस घ्यावी, असे आवाहन कदम यांनी केले आहे.
बॉक्स
रविवारीही लसीकरण सुरू
जिल्हा रुग्णालय आणि टीबी रुग्णालय भंडारा, आरोग्यवर्धिनी केंद्र गणेशपूर, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी (ता. तुमसर) या ठिकाणी रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण सुरू राहणार आहे. कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. कोविड या संसर्गजन्य आजाराची तपासणी करण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तसेच लक्षण जाणवणाऱ्या प्रत्येकाने कोविड टेस्ट करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जवळच्या टेस्टिंग केंद्रावर जाऊन चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
बॉक्स
तीन लक्ष ३४ हजारांचा दंड वसूल
२१ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, लग्नसमारंभ, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून जिल्ह्यात तीन लाख ३४ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक दंड मास्क न वापरणाऱ्या १७४१ नागरिकांकडून वसूल करण्यात आला.
बॉक्स
रात्रीची संचारबंदी
जिल्ह्यात १४ मार्चपासून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावलेला नसल्यास त्यांना मास्क लावल्याशिवाय वस्तू देऊ नये, असे आवाहन त्यांनी दुकानदारांना केले. ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ हे धोरण अवलंबावे, असे ते म्हणाले. नियमांचे पालन न करणारे लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल, व्यापारी प्रतिष्ठान तसेच मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.