भंडारा : रेल्वेने प्रवास करत असाल आणि जास्त सामान नेले तर ते तुम्हाला महागात पडणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त सामान रेल्वेतून नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. जर कोणाला जास्त सामान न्यायचे असेल तर त्याला पार्सल ऑफिसमधून सामान बुक करावे लागते.
रेल्वेने जाहीर केलेल्या नियमानुसार, विहित मर्यादेपेक्षा जास्त मालाची ने-आण केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत रि हँडलवरून ट्वीट करून लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. प्रवासादरम्यान सामान रेल्वेने नेण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जास्त वजन घेऊन गेल्यास दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आता रेल्वेतून प्रवास करताना सामानाच्या मर्यादेचे पालन करावे लागणार आहे.
जास्तीच्या सामानासाठी मोजावे लागणार पैसे
स्लीपर क्लासमधील प्रवासी जर ८० किलो सामान घेऊन जात असेल तर याचा अर्थ तो ४० किलो जास्त सामान घेऊन जात आहे.
जर तो ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करणार असेल तर त्याला १०९ रुपये दंड भरावा लागेल.
४० किलो स्लीपर क्लाससाठी
रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजन वेगळे ठरवण्यात आले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ४० किलो वजनाच्या सामानासह प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतो.
५० किलो २ टायर एसीसाठी
२ टायरसाठी ५० किलो वजन मर्यादा ठरविण्यात आली आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त मर्यादेच्या सामानाची वाहतूक करणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
७० किलो फर्स्ट क्लास एसीसाठी
ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवासी ४० ते ७० किलो सामान घेऊन जाऊ शकतो. फर्स्ट क्लास एसीबद्दल बोलायचे झाले तर त्यात ७० किलोपर्यंत सामान नेण्याची सूट आहे.
रेल्वेने प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका. जर तुमच्याकडे जास्त सामान असेल तर पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामान बुक करा.
- एक कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल