करडी(पालोरा):- राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील बोनसची रक्कम सोमवारपासून थेट धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली. मात्र, पालोरा येथील इंडियन बँक व बँक ऑफ बडोदा मोहाडी येथील १०६२ शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील बोनस प्राप्त झाली नाही. जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयएफसी कोडचा घोळ संबंधित धान खरेदी संस्थांनी दुरुस्त केल्यानंतरही शेतकऱ्यांची अडवणूक का? असा प्रश्न विचारला जात आहे.
शासनाचे पहिल्या टप्प्यातील धानाचे बोनस जमा होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटत आहे. परंतु पालोरा, करडी व डोंगरदेव शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. यामध्ये मोहाडी तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या वतीने संचालित मोहाडी येथील ७० शेतकऱ्यांचे ८ लाख ६३ हजार १७० रुपये, मोहगाव देवी येथील १४ शेतकऱ्यांचे एक लाख ६९ हजार ४०० रुपये मोहाडी येथील बँक ऑफ बडोदा शाखेत अडले आहेत. तर पालोरा धान खरेदी केंद्रातील ५०३ शेतकऱ्यांचे ३९ लाख एक हजार ९०५ रुपये, तसेच डोंगरदेव धान खरेदी केंद्रातील ३३८ व करडी येथील १४७ शेतकऱ्यांची बोनसची रक्कम अद्यापही पालोरा इंडियन बँकेतून शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही.
बॉक्स
बँक विलीनीकरणाचा फटका
वर्षापूर्वी आर्थिक डबघाईमुळे अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत तर देना बँकचे बँक ऑफ बडोदात विलीनीकरण झाले. परंतु जुलै २०२१ पर्यंत मोहाडी तालुक्यातील दोन्ही बँकांच्या शाखांनी शेतकऱ्यांच्या खात्यांचे आयएफसी कोड न बदलविल्याने बोनस व उन्हाळी धानाची रक्कम १४४० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नव्हती. अखेर जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थांना आयएफसी कोड दुरुस्त करून नव्याने मान्यता घेण्याचे आदेश दिल्याने संबंधित धान खरेदी संस्थांनी दुरुस्ती याद्या जिल्हा पणन कार्यालयाकडून प्रमाणित करून घेतल्या. त्यामुळे उन्हाळी धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. परंतु पहिल्या टप्प्यातील बोनस रक्कम १०६२ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
बाॅक्स
शेतकऱ्यांमध्ये असंतोष
राज्य शासनाने गत हंगामातील खरीप धानासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ७०० रुपयांच्या बोनसची घोषणा केली होती. त्यापैकी ५० टक्के रक्कम सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. परंतु पालोरा येथील इंडियन व मोहाडीतील बँक ऑफ बडोदा येथील खातेधारक शेतकऱ्यांच्या खात्यात सण व उत्सवांच्या दिवसात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोषाची भावना आहे. आठ दिवसात बोनस जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सरिता चौरागडे, के.बी. चौरागडे यांनी दिला आहे.
कोट
पहिल्या टप्प्यातील बोनस रकमेसंबंधीची माहिती घेऊन तत्काळ निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ पैसे वळते करण्याचा प्रयत्न आहे.
- हर्षल महादुले,
व्यवस्थापक इंडियन बँक शाखा पालोरा