लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर प्राचिन व ऐतिहासिक नगर म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.भंडारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका येथे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे सन १८६७ पासून येथे नगरपालिका असून त्यावेळी नगराची लोकसंख्या ५० हजारांवर होती. लोकसंख्या कमी होणारे एकमेव गाव असावे. महाभारतात पयोष्णी व वेणा असा उल्लेख असलेल्या प्रसिद्ध वैनगंगा नदीचे तिरावर हे गाव वसलेले आहे. सम्राट अशोकाचे कालखंडापासून गाव अस्तित्वात असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्टÑकुट व यादव या राजवंशानी राज्य केल्याचे पुरावेसुद्धा उत्खननात सापडले. इ.स. १३१८ मध्ये यादवांचे राज्य लयास गेल्यावर देवगडच्या गवळी राजाची सत्ता येथे प्रस्तावित झाली. त्यांचे राजवटीत येथे भुईकोट किल्ला बांधला तो हल्ली अस्तित्वात नाही.यादव वंशीय राजाकडून चांद्याच्या गोंड राजानी हा प्रदेश जिंकला व नगराचे संरक्षणासाठी १५ व्या शतकात परकोट (किल्ला) बांधला असावा तो सध्या अस्तित्वात आहे. पवनीच्या उत्तरेस वैनगंगा नदी व उर्वरीत तीन दिशांना यु आकाराची मातीची भिंत (टेकडी) व पश्चिमेकडे एक भव्य प्रवेशद्वार व टेकडीवर डोंगरी किल्ला (परकोट) अस्तित्वात आहे. पुरातत्व विभागाने संरक्षीत करून त्याची निगा राखली आहे.गोंड राजाची सत्ता असताना वैभव संपन्न गाव म्हणून रघुजी राजे भोसले यांनी स्वारी करून हा प्रदेश १७३९ ला ताब्यात घेतला. त्यानंतर १८१८ मध्ये तीनदा पेंदाज्यांनी आक्रमण केले. पवनीकरांची दागदागीने व संपत्ती लुटली. तीसऱ्या आक्रमणाचे वेळी पवनीकरांनी एकजुटीने पेंढाज्यांना पिटाळून लावले. त्यामुळे १७३९ ते १८१८ पर्यंत पवनी भोसले राजवटीत होते. सन १८१८ मध्ये पवनीचा प्रदेश इंग्रजांनी ताब्यात घेतला व त्यांचे कारकिर्दीत १८६७ ला नगरपालिका स्थापन केली. पवनी नगरात विणकर (कोष्टी) समाज फार मोठ्या प्रमाणात होता येथे जरी काठाची लुगडी व कापड बनविण्याचे हातमाग मोठ्या प्रमाणात होते. जरी काठाचे उत्तम कापड येथून बाहेर निर्यात होत असे. १८६५ मध्ये नागपूर येथे आयोजित प्रदर्शनीत पवनी येथे निर्मित कापडांना प्रथम व द्वितीय पुरस्कार मिळाल्याची नोंद आहे.यावरून विणकर समाजाचे कुशल कारागिर येथे होते. कोसा साडी व कापडाची निर्मिती सुद्धा येथील हातमागावर कोष्टी समाज करीत होता. कोष्टी समाजाप्रमाणे बारई समाज पवनी येथे मोठ्या संख्येने होता.जिल्ह्यातील मोठे पानमळे पवनी येथे होते. त्यावेळी सामूहिक शेतीच्या पद्धतीने बारई समाज बिड्याच्या पानांचे मोठे उत्पादन येथे घेत होता व त्याची निर्यात करून चांग़ला व्यवसाय करीत होता. येथील ढिवर समाज सुद्धा व्यवसायात त्यावेळी पुढारलेला होता. मासेमारी सोबतच सर्व मोठ्या तलावात सिंगाळा उत्पादीत करण्यात अग्रेसर होता. येथील सिंगाडा चविष्ठ म्हणून अन्य जिल्ह्यात निर्यात केल्या जात होता. सन १९०५ मध्ये पवनी येथे पूर्व माध्यमिक शाळा, शासकीय मुलींची शाळा व उर्दू शाळा अस्तित्वात होती.
पवनीच्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 1:05 AM