शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात. त्या सुप्त गुणातून इतरांची मने जिंकून आपल्या कलेतून समाज प्रबोधन करणारा बहुरुपी कलावंतांचा समाज अनादिकालापासून उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरुपी म्हणून ओळखली जाते.आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम हा समाज करत आहे. मात्र आज या समाजाची अवस्था दयनीय असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळते.वंशपरंपरेनुसार बहुरुपी विविध प्रकारचे सोंग घेऊन आपली कला प्रदर्शित करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. साकोली तालुक्यात चारगाव व परिसरात अनेक बहुरुपी कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील कर्ते पुरुष विविध रुपे धारण करून अनेक भूमिका वठवितात. त्यात स्त्री पोशाख परिधान करून कुमारिका, गृहिणी, पोलीस, डॉक्टर, शंकर पार्वती, हनुमान, राम सीता, श्रीकृष्ण अशी विविध रुपे धारण करून लोकांचे मनोरंजनातून समाजप्रबोधन करतात. त्या माध्यमातून मिळणाºया अत्यल्प मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसाकाठी मिळणाºया अल्पश: मिळकतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलवतानाच विविध सोंग धारण करण्यासाठी लागणाºया सामानांची तजवीज त्यांना करावी लागते.वंशरंपरेने चालत आलेल्या आणि अवगत झालेल्या कलेच्या आधाराशिवाय त्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. विशेष बाब म्हणजे या समाजात महिलांना बहुरुप्याचे सोंग करण्यास मनाई असल्यामुळे फक्त पुरुषच सोंग घेऊन कला प्रदर्शित करतात. या समाजाचा भटक्या जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या समाजाकडे स्वत:ची शेती नाही. कोणतेही दुसरे काम नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांनाही फारसे शिकविण्यात येत आहे. कसेबसे शिक्षण घेतलेच तर शिक्षणानंतर नोकरी नाही. अशा परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परिसरात कोणतेच काम उपलब्ध नसते. तेव्हा या समाजातील पुरुष मंडळी अनेक मोठ्या शहरांमध्ये जाऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. त्यानंतरच्या कालावधीत गावाकडेच मिळेल ते काम करून आपली उपजिविका करताना दिसून येतात. शासनाने यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विविधांगी कलागुण जोपासणारे बहुरुपी उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 11:02 PM
प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात.
ठळक मुद्देउपजिवीकेसाठी दाहीदिशा : समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नाची गरज