गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : देवरीवरून नागपूरला ट्रकमध्ये जनावरे कोंडून वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून पोलिसांंनी ३२ जनावरांची सुटका केली. यात ट्रक जप्त करून वाहनचालकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या गुप्त सूचनेनुसार वडोदा येथे जाणाऱ्या जनावराचा ट्रक ठाणेदार सुभाष बोरकुटे, पोलिस हवालदार लोकेश शिंगाडे, वसंता गजभिये यांनी अडविला. ट्रकची झडती घेतली असता अतिशय निर्दयपणे जनावरे कोंबलेली आढळली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा पेट्रोल पंप येथे सकाळी ९:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. ट्रक क्रमांक सी जे - ०८ ए यु- ०९६५६ व काड्या पांढऱ्या लालसर रंगाच्या एकूण ३२ गोवंश जातीचे जनावरे असे, एकंदरीत ६ लाख ६० हजार किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला.
मोहम्मद राशीद बदरुझामा बेग (३२, हमीदनगर उप्पलवाडी, नागपूर), साजीद शेख शाबीर शेख (२६, संघर्षनगर, अटोमॅटीक चौक, नागपूर), हितेश शिवेंन्द्रा डहरीया (२३, जि. दुर्ग) यांना ताब्यात घेण्यात आले. जनावरे ज्ञान फाउंडेशन गोशाला खरबी (नाका) येथे सोपविण्यात आली.