भंडारा तालुक्यातील अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या सिल्ली गावात व आजुबाजूच्या परिसरात मुरूम माफियांनी धुडघूस घातला असून मुरूम उत्खननाचा सपाटा चालविला आहे. येथून हजारो ब्रास मुरूमचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल कर्मचारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. यामुळे मुरूम चोरीला आळा बसण्याऐवजी मुरूम उत्खनन व्यवसायाला गती आल्याचे दिसून येत असल्याने याला पाठबळ महसूल विभागाचे असल्याचा सिल्ली ग्रामस्थांचा आरोप आहे.
सिल्ली गावात माती, मुरूम चोरीचेही प्रस्थ वाढत सर्वत्र पहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती-मुरूमची बेकायदेशीररित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलॅन्ड मशीनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही. कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरुम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरुम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. महसूल प्रशासनाने रॉयल्टी धारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन याची चौकशी करून कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावावर मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बॉक्स
प्रशासनाची डोळेझाक
सिल्ली गावातील परिसरात नियमबाह्य मुरूमचे उत्खनन होत आहे. संबंधित व्यावसायिकांनी खनिकर्म व तालुका प्रशासनाची डोळेझाक करत बेकायदेशीररित्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्यात व्यस्त आहेत. परिणामी रात्रंदिवस बेधडकपणे मुरूमची वाहतूक होत असून स्थानिक जबाबदार महसूल प्रशासनाने डोळेझाक केली आहे.