रत्ना गणेश कोडमवार, रंजित गणेश कोडमवार व ईश्वर गणेश कोडमवार, सर्व रा. कन्हाळगाव अशी अवैध दारू विक्रेत्यांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार गत वर्षभरापासून तालुक्यातील कन्हाळगाव येथे दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र, १५ जानेवारी रोजी या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने काही उमेदवार व मतदारांनी गावात दारू आणली होती. दरम्यान, या संधीचा लाभ घेत घटनेतील आरोपींनी अवैधपणे दारू विक्रीसाठी देशी दारूच्या बाटल्या घरी आणल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. सदर माहिती मिळताच गावकऱ्यांनी लाखांदूर पोलिसांना दिली. त्यानुसार येथील ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम व ठाणे अमलदार मनीष चव्हाण यांनी कन्हाळगाव येथे जाऊन गावकऱ्यांसमक्ष घटनेतील आरोपींच्या घराची झडती घेतली. यावेळी आरोपींच्या घरातून १०७० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३१ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहेत.