पांढरी : गावात दारूबंदी असतानाही दारू विक्रेत्याला अवैध दारूची विक्री करताना गावातीलच जिजामाता महिला परिवर्तन पॅनलच्या महिलांनी रंगेहात पकडले. ही कारवाई तालुक्यातील ग्राम पांढरी येथे शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
पांढरी येथे दारूबंदी असताना काही अवैध दारू विक्रेते दारूची विक्री करत गावातील वातावरण दूषित करत आहेत. याआधी महिलांनी दारूबंदीसाठी अनेक आंदोलनेही केली. मात्र, अवैध दारू विक्रेत्यांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवून जिजामाता महिला परिवर्तन पॅनलच्या महिला दारू पकडण्याचे काम करत आहेत. या महिलांना अवैध दारू विक्रीची माहिती मिळाली असता, त्यांनी दारू विक्रेत्याच्या घरी जाऊन दारू पिताना त्याला रंगेहात पकडले. यावेळी दारूच्या काही बाटल्या जमिनीखाली पुरलेल्या होत्या, त्यासुद्धा या महिलांनी काढून एकूण ११२ बाटल्या जप्त केल्या. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता, पांढरी बीटचे पोलीस डोंगरवार यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.
यावेळी जिजामाता महिला परिवर्तन पॅनलच्या हिमकला प्रधान, किरण मेश्राम, सुनीता येडे, छाया पटले, सुशीला केवट, कुसुम ठाकरे, मंगला अंबुले, प्रमिला पटले, अलका ठाकरे, सुलोचना अंबुले आदी महिला उपस्थित होत्या.