लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात गत काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण जेमतेम आहे. पाऊस पडत नाही याचे कारण म्हणजे अवैध वृक्षतोडच आहे. अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात असून आजघडीला झाडांपासून मिळणाऱ्या मोफत ऑक्सिजनला पैसे देऊन विकत घ्यावे लागत आहे.
बारव्हा परिसरातील पारडी, बोरगाव, दहेगाव, दांडेगाव,कोच्छी गाव जंगलव्याप्त वनराईने नटलेला भाग म्हणून ओळखला जाणारा आहे. या परिसरातील शेतशिवारात मोठी झाडे पाहायला मिळत होते;मात्र अवैध वृक्षतोडीमुळे शेतशिवाातील झाडे पूर्णतः नष्ट झाली आहेत. गत चार वर्षांपासून पाऊस तुरळक पडत असल्याने या परिसरातील शेतकरी होरपळून निघत आहेत. यात शेतकऱ्यांनी झाडे लावले तर त्याचा परिणाम पावसाच्या रुपात नक्कीच दिसून येऊ शकतो, परंतु झाडांची जर तोड अशीच सुरु राहिली तर एकदिवस पाऊसच पडणार नाही, असाही संभावित धोका निर्माण होऊ शकतो. याची काळजी शेतकरी वर्गांनी घेणे गरजेचे आहे;परंतु या परिसरातून सध्या मोठमोठ्या झाडाची अवैधरित्या वृक्षतोड जोमात सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दररोज दिवसाढवळ्या एवढी वृक्षतोड होऊनही वनविभाग व पोलीस प्रशासन गप्पच का? यांच्यावर कुठलीही कारवाई नाही का? असा सवाल काही पर्यावरणप्रेमी आणि सामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळे कुछ तो दाल मे काला है, असे जनतेतून बोलले जात आहे. शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा मोहीम जोरात सुरू आहे. परंतु शासननियुक्त कर्मचारी याकडे निमूटपणे डोळेझाकपणा का करत असतील हा मात्र प्रश्न जनतेला पडला आहे. कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाकडे मागायची असा संभ्रमित प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.