तहसीलदारांचे दुर्लक्ष : अधिकाऱ्यांशी संगनमतकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील अनेक रेती घाटातून अवैध उपसा सुरु आहे. वैनगंगा रेती घाट जणू तस्करांसाठी खुले केल्यासारखी अवस्था आहे. पोलीस विभाग प्रकरणी हातावर हात ठेवून गप्प आहे. महसूल विभागाचे अधिकारी घाटांकडे फिरकताना दिसत नाही. तस्करांचे अधिकारी वर्गाशी साठगाठ असल्याची ओरड नागरिकात आहे. अनेक ठिकाणी रेतीची अवैध साठवणूक करण्यात आली असून विक्री सुरु आहे.मोहाडी तालुक्यात रेतीचा अवैध कारोबार राजरोसपणे सुरु आहे. तस्करी होणाऱ्या रेतीघाटांमध्ये वैनगंगा, सूर नदी घाटांचा समावेश आहे. अधिकारी वर्गाशी आपसी सेटींग असल्याच्या चर्चा तस्करांमध्ये आहेत. तस्करांनी रेतीची तस्करी करण्याची वेळ पहाटे पासून सकाळ पर्यंत निवडली आहे. रात्री ११ वाजता नंतर तस्कर घाटातून ट्रॅक्टरद्वारे रेती नदी काठावर जमा करतात. काही तर सरळ विक्रीसाठी घेवून जाताना दिसून येतात. काठावर तस्करी करून ठेवलेली रेतीची माहिती तलाठ्यामार्फत राजस्व विभागाला दिली जाते. मंडळ अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत रेतीची अंदाजे मोजणी केली जाते.हे सर्व करण्यासाठी कर्मचारी वर्गापासून वरिष्ठांपर्यंतचे दलालीचे दर ठरलेली असल्याचे बोलले जाते. जे तस्करांना सहकार्य करीत नाही. त्यांना पाहून घेण्याबरोबर फसविण्याची धमकी सुद्धा दिली जात असल्याचे काही घटनावरून उघड झाली आहे. पोलीस विभागाची आडकाठी येवू नये म्हणून त्यांचीही वेगळी सेटींग केली जात आहे. सगळा सेटींगचा मामला या ठिकाणी असल्याचे जाणकारांचे मत आहे. रेती तस्करीचे मोठे रॅकेट तालुक्यात पहावयास मिळत असून तस्करीमध्ये सर्वच राजकीय व्यक्तींबरोबर, राजकीय पक्षांच्या समर्थकांचा समावेश आहे. (वार्ताहर)
मोहाडी तालुक्यात रेतीचा अवैध उपसा
By admin | Published: January 31, 2016 12:38 AM