दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम (४८, रा. आंबेडकर वॉर्ड), शुभम उर्फ झब्या देवेंद्र कटकवार (२३, रा. कुंभारेनगर), भूपेंद्र मोहन गिरोलकर, मनोज देवीदास कान्हेकर (२५, रा. कुंभारे वॉर्ड,) गप्पू सांडेकर, कालू माटे आणि नईन शेख (सर्व, रा. तुमसर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश, शुभम आणि मनोज या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तुमसर येथील आंबेडकर वॉर्डात मंगळवारी दुपारी २.१५ वाजता एका टोळक्याने देशी कट्ट्यातून गोळीबार केला. त्यात संतोष दहाट गंभीर जखमी झाला. या घटनेमागे रेतीतस्करीचे कारण असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. संतोष हा रेती व्यवसायात आपला जम बसविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे या व्यवसायात आधीपासून असलेल्यांचे नुकसान होणार होते. त्यासाठीच नईन शेख याने कट रचून दहाडला ठार मारण्यासाठी इतर सहा जणांना प्रवृत्त केले. मंगळवारी संतोष डॉ. आंबेडकर वॉर्डातील रूस्तम लांजेवार यांच्या घराच्या मागील मोकळ्या जागेत बसलेला होता. त्यावेळी संशयित सहा जण तेथे आले. त्यापैकी दिनेश, शुभम आणि भूपेंद्र या तिघांनी देशी कट्ट्यातून संतोषवर गोळी झाडली, तर मनोज कान्हेकर याने संतोषच्या हातावर आणि गळ्यावर चाकूने हल्ला केला. मंगेश गेडाम हा त्याला अडविण्याचा प्रयत्न करीत असताना दिनेश मेश्रामने त्याच्या हातावर चाकूने वार केला. संतोष गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी सौरभ नंदकिशोर माने याने तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांना अटक केली. तक्रारदाराचे बयाण आणि सरकारतर्फे सहायक पोलीस निरीक्षक बानबले यांनी तक्रार दिली. त्यावरून सात जणांविरुद्ध भादंवि ३०७, १४३, १४७, १४८, १४९, १२० ब, आणि भारतीय हत्यार कायदा ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.