मोहाडी : मोहाडी व तुमसर तालुक्यात ८ ते ११ सप्टेंबरपर्यंत सततच्या पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. काही घरे अंशत: तर काही घरे पूर्णतः पडलेली आहेत. या नुकसानग्रस्त घरांचे तत्काळ पंचनामे करून गरजू लोकांना लाभ देण्यात यावे, असे निर्देश तुमसर-मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांनी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहे.
आमदार राजू कारेमोरे यांनी शनिवारला स्वतः जाऊन पावसामुळे प्रभावित अनेक घरांची पाहणी केली. त्यात मोहाडी तालुक्यातील सिरसोली येथील ७ ते ८ घरे पावसाच्या पाण्यामुळे पडल्याचे समजले. आ. कारेमोरे यांनी तत्काळ तेथील तलाठ्यांना बोलावून, खलील छवारे, जलील छवारे, शोभेलाल कस्तुरे, फेकन लिल्हारे, कुसुम गाढवे, रशीद तेले, खलिक तेले यांच्या घराचे पंचनामे करण्याचे सांगून तहसीलदारांना निर्देश दिले. यावेळी राष्ट्रवादी तालुका तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, वसंत लिल्हारे, शंकर मोहारे, कलीम शेख, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व सिरसोली ग्रामवासी प्रामुख्याने हजर होते.