भंडारा : मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नाही. परंतु, ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. सवर्णांना १० टक्के आरक्षण देतांना शासनाने आधीच मर्यादा ओलांडली आहे. मग, मराठ्यांसाठी मर्यादेचे सोंग कशासाठी ? सत्ताधाऱ्यांनी ओबीसी आरक्षणाला बाधा पोहचवू नये, अन्यथा ओबीसींच्या २४२ जातींच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशारा ओबीसी संघटनांच्या वतीने देण्यात आला.भंडारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात १७ सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी व्यापक निषेध व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.
सत्ताधाऱ्यांनी ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा कट रचला आहे. मराठा व ओबीसींत भांडणे लावून दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. जे मणीपूरमध्ये केले, तोच प्रकार महाराष्ट्रात करण्याचा मनसुबा आहे. परंतु, ओबीसी सतर्क आहेत, ओबीसींनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. शासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी. नचीअप्पन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी ओबीसी संघटनांनी केली.
निषेध व धरणे आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी क्रांती मोर्चा, युथ फॉर सोशल जस्टीस, ओबीसी जागृती मंच व ओबीसींच्या सर्व जातीय संघटनांनी केले. याप्रसंगी शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी ओबीसी संघटनांचे मुख्य समन्वयक सदानंद इलमे, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, संजय मते, डॉ. मुकेश पुडके, गजानन पाचे, हितेश राखडे, ताराचंद देशमुख, जयंत झोडे, आनंदराव उरकुडे, मंगला वाडीभस्मे, अंजली बांते, जयश्री बोरकर, सुभद्रा झंझाड, अरूण जगनाडे, राजू लांजेवार, वामन गोंधुळे, राकेश झाेडे, आनंदराव कुंभरे, बंडू गंथाडे, सेवकराम शेंडे, राजेश मते, छगन ब्राम्हणकर, धनराज पाऊलझगडे, दिलीप ब्राम्हणकर, उमेश मोहतूरे, श्रीकृष्ण पडोळे, सुरेश लंजे, यादवराव कावळे, अशोक दुपारे, योगेश शेंडे, अक्षय लुटे, कैलास राऊत, शंकर दिवटे, कैलास गिरेपूंजे, बाबुराव बिसेन, रामचंद्र राऊत, विनायक हाडगे तसेच मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महिलांची उपस्थिती लक्षवेधीओबीसी आंदोलनात यावेळी महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. महिलांच्या भाषणांनी आंदोलनात उत्साह भरला. 'अभी तो ऐ अंगडाई है, आगे और लढाई है', जय ओबीसी, जय... जय ओबीसी, असा नारा यावेळी महिलांनी दिला.कंत्राटी नोकर भरतीचा निषेधशासनाने नोकरीतील आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात सर्वांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. सर्वांचे आरक्षण यामुळे संपणार आहेत. त्यामुळे कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.