नाना पटोले : पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश, जिल्हा विकास समितीची आढावा बैठकलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक लोकहितोपयोगी योजना आहेत, या सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. पीक विमा योजना, पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना व मनरेगा यासह सर्व योजनांचा लाभ शेवटच्या माणसाला मिळवून द्यावा असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले. शासनाच्या योजना प्रशासकीय बाबीत अडून न ठेवता योग्य नियोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलिस अधिक्षक विनिता साहू व मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यावेळी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचे अनुपालन वेळेच्या आधी करावे, अशा सूचना खासदार पटोले यांनी दिल्या. प्रधानमंत्री घरकुल योजनेचे नियोजन पालिकांनी मोठ्या प्रमाणात करावे. ही योजना गरिबांच्या हिताची असून यासाठी लागणारी जागा निश्चित करण्यात यावी असे ते म्हणाले.वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करणे व वनहक्क दावे हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी नियोजन करावे असे त्यांनी सांगितले. हे विषय प्राधान्याने असून पुढील बैठकीत या संबंधीचा अहवाल सादर करावा, असे ते म्हणाले. प्रत्येक विभागाने विकास योजनांची फलश्रुती याबाबत सादरीकरण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वनहक्क समितीने शिफारस केलेल्या जमिनीस पट्टे दयावे व गरिबास न्याय मिळवून दयावा, असेही ते म्हणाले. वषार्नुवर्ष एकाच ठिकाणी वास्तव्यास राहणाऱ्या व्यक्तीच्या कुटूंबास सकारात्मक विचार करुन जमिनीचा पट्टा दयावा, असेही खासदार पटोले म्हणाले.विविध योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचा निधी लाभार्थ्यांना देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासनाच्या योजनांची योग्य अमलबजावणी करतांना खरे लाभार्थी वंचीत राहू नये याची काळजी घेण्यात यावी. केवळ बचत गटांची संख्या न वाढवता महिला बचत गटांना व्यावसायाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले. बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. आॅक्टोबंर महिन्यात बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यात उद्योमशील बचत गटांचा समावेश असावा, असे ते म्हणाले.प्रधानमंत्री घरकुल शहरी व ग्रामीण भाग यावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना प्रकरण मंजूर करतांना मानवतावादी दृष्टिकोन ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. एखादे प्रकरण रद्द करण्यात आले असेल तर त्यांना तशी सूचना लेखी कळवावी, असेही त्यांनी सांगितले. पंडीत दीनदयाल उपाध्याय घरकुलासाठी भूखंड योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यालय काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. भंडारा जिल्ह्यासाठी ओरिएंटल कँपनी नियुक्त केली असून त्यांनी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जोखीम स्तर ७० टक्क्यावरून ९० टक्यांवर करावी, अशी सूचना कृषी विभागाने मांडली.राष्ट्रीय आरोग्य अभियानात माता बालमृत्यू दर कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात याव्यात. जिल्ह्यातील ‘सॅम व मॅम’ ची संख्या कमी व्हायला पाहिजे, अशा सूचना आरोग्य खात्याला देण्यात आल्या आहेत. या योजनेचा स्वतंत्र आढावा घेण्यात येईल.ज्या शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत, त्या प्राधान्याने दुरुस्त करण्यात याव्यात. कन्हाळगाव येथील शाळा तंबू मध्ये भरविण्यात येते ही बाब गंभीर असून शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेला तात्काळ भेट देऊन पयार्यी व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले. विद्याथ्यार्ची आरोग्य तपासणी नियमित करावी तसेच कुठला आजार जास्त प्रमाणात आढळतो याचा अहवाल सादर करावा.या बैठकीत मनरेगा, दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन, पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्वला योजना, कौशल विकास योजना यासह विविध योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे संचालन जगन्नाथ भोर यांनी केले. बैठकीस पंचायत समिती सभापती व समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
लोकहिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा
By admin | Published: July 14, 2017 12:50 AM