पवनी तालुक्यात कोविड-१९ रुग्ण मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह सापडत असून, त्यावर ग्रामीण रुग्णालयांच्या मार्गदर्शनात कोविड सेंटर येथे उपचार केले जात आहेत. परिणामी अनेक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सिंदपुरी येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. या ठिकाणी असलेल्या सुखसोयींचा आढावा घेत रुग्णांना नियमित उपचार, येथील जेवणाचा दर्जा, उत्तम स्वच्छता, रुग्णांचे समुपदेशन, योगासारखे व्यायाम नियमित करण्याचे सुचविले. सिंदपुरी कोविड केअर सेंटरमधील सुविधांची पालकमंत्र्यांनी विशेष दखल घेतली. सिंदपुरी येथील लसीकरण केंद्रावर भेट देऊन पालकमंत्र्यांनी नागरिकांची विचारपूस करून जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याचे आव्हानही केले.
सिंदपुरी येथील कोविड केअर सेंटर १५० बेडचे असून, ऑक्सिजन सोयीने परिपूर्ण आहे. याठिकाणी रुग्णांना आवश्यक सोई पुरविल्या जात असल्यामुळेच येथून जवळपास २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. येथे पवनी तालुक्यातीलच नाही तर परजिल्ह्यातील रुग्णसुद्धा उपचारासाठी येत आहेत. कोविड सेंटरला आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी कदम, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली आहे. यासाठी पालकमंत्री यांनी उपविभागीय अधिकारी राठोड, तहसीलदार नीलिमा रंगारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुरुचरण नंदागवळी, गटविकास अधिकारी प्रमिळा वाळुंज, मुख्य अधिकारी रवींद्र डहाके, तालुका आरोग्य अधिकारी तलत अन्सारी, न्यूरोथेरेपिस्ट शाहिद अली, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, डॉ. चेतना वाघ, डॉ. धनराज गभने यांची प्रशंसा केली.
सिंदपुरी कोविड सेंटर यांची माहिती घेताना पालकमंत्री कदम व जिल्हाधिकारी संदीप कदम.